सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : गोपीचंद पडळकर यांच्या बलगबच्च्यांनी राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना फोनवरून अत्याचार करण्याची धमकी दिली आहे. या प्रकाराने राष्ट्रवादीच्या महिला, युवती घाबरणार नाही. आम्ही राष्ट्रवादीच्या वाघिणी आहोत. पडळकरांच्या बगलबच्च्यांना घरात घुसून मारू, असा इशारा राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेश सचिव स्मिता देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिला.
देशमुख म्हणाल्या, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला लढण्याची ताकद दिली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमुळे सर्वसामान्य महिला सुरक्षित आहेत. आमचे सरकार, पोलीस यंत्रणा आमच्यासोबत आहे. पडळकरांचे बगलबच्चे घाणेरड्या भाषेत बोलतात, आम्ही राष्ट्रवादीच्या वाघिणी आहोत. पक्षाने आम्हाला तेवढी ताकद दिली आहे. धमक्यांमुळे आम्ही घाबरून बसणार नाही.
पडळकर हे केवळ प्रसिद्धीसाठी साहेबांविषयी बोलतात. मात्र त्यांच्या बगलबच्च्यांनी सुरू केलेला प्रकार तत्काळ थांबवावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील महिला, युवती पेटून उठतील, महिलांवरील अशी अत्याचाराची भाषा खपवून घेणार नाही.पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी फालतुगिरी सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांवरील घाणेरडी टीका थांबवा अन्यथा घरात घुसून मारू. महिलांना राजकारणात पुढे जाण्यासाठी आरक्षण मिळाले आहे. कुठेही अन्याय, अत्याचार होत असेल तर त्याचा विरोध करण्याची आमची तयारी आहे. गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार थांबवावा, असे आवाहनही देशमुख यांनी यावेळी केले.
You must be logged in to post a comment.