याशनी नागराजन, मोहसीन मोदी यांच्या तत्परतेबद्दल दिव्यांगांनी व्यक्त केले समाधान
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : येथील जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये दिव्यांगांसाठीचा रॅंप तयार करण्यात आला असून त्यामुळे येथे येणाऱ्या दिव्यांगांची गैरसोय दूर होणार आहे. दिव्यांग प्रेरणा सामाजिक संघटनेने केलेल्या मागणीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मोहसिन मोदी यांनी तातडीने याबाबत हालचाल केल्याने दिव्यांगांतून समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत यापूर्वी उपलब्ध असलेले दिव्यांगांसाठीचे रॅम्प व्यवस्थित नव्हते. तर पाठीमागच्या बाजूस असलेल्या विस्तारित इमारतीमधील रॅम्प खूप उंच असून त्यास रेलिंग नाही. याबाबत दिव्यांग संघटनांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दुरुस्तीची मागणी केली होती. त्यानुसार प्रत्यक्ष कार्यवाहीला रविवारी सुरुवात झाली. रविवारी दिव्यांगाचे रॅम्पचे काम करण्यात आले. त्याचबरोबर पुढच्या इमारतीत पश्चिम बाजूला नळाच्या पाईपला गळती लागली होती. तेही दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या तळ मजल्यात समाज कल्याण विभागाचे कार्यालय आहे. त्या कार्यालयात दिव्यांग कक्ष असून त्यामध्ये जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून दिव्यांग अडीअडचणी घेवून येत असतात. त्यांना जिल्हा परिषदेमध्ये जाताना व येताना रॅम्प होता. परंतू तो नेटका नव्हता. त्यामुळे तो दुरुस्त करण्याबाबतची मागणी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेबरोबर इतर संघटनांनीही केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे अभियंता मोहसिन मोदी यांनी ही बाब सकारात्मक दृष्टीने घेवून तेथे सुरळीत व सुरक्षित असा रॅम्प तयार करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार रॅम्प तयार करण्यात आला. त्याचबरोबर कित्येक दिवसांपासून पुढच्या इमारतीच्याच पश्चिम बाजूला भिंतीवरुन पाणी गळत होते. तेच पाणी साठून डास तयार होत होते. त्याबाबतही दुरुस्ती करण्याच्या सुचना अभियंता मोदी यांनी दिल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
दिव्यांगांची गैरसोय दूर होणार
दिव्यांगाच्या होत असलेल्या गैरसोयीच्या सर्व बाबींचा विचार करुन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी रॅम्पबाबत सुचना दिल्या. त्याबाबत त्यांचे आम्ही दिव्यांग बांधवांच्यावतीने आभार मानतो, अशी प्रतिक्रिया दिव्यांग प्रेरणा सामजिक संघटनेचे अध्यक्ष अजय पवार यांनी व्यक्त केली आहे.
You must be logged in to post a comment.