सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : राज्यात ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवतो आहे, या पार्श्वभूमीवर सातारा येथे पत्रकार परिषदेत बोलताना माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, दोन दिवसांत रेमडेसिवीर इंजेक्शन नागरिकांना मिळालं नाही तर कोरोनाग्रस्तांना घेऊन मातोश्रीवर आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
यावेळी राज्य सरकारवर टीका करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, “तुम्हाला कमीशन मिळत नाही, तुम्हाला कंपन्यांकडून खंडण्या मिळत नाहीत म्हणून तुम्ही इतरांना देखील औषध घ्यायला या राज्यात तुम्ही बंदी केलेली आहे, जी कोंडी तुम्ही केलेली आहे, ठाकरे सरकारला मी सांगतोय ही कोंडी तुम्हाला हटवावी लागेल. ही जर कोंडी सरकारने जर नाही हटवली तर ज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही, त्या सगळ्या कोरोनाग्रस्ताना घेऊन मी अचानकपणे मातोश्रीवर जाऊन ठाण मांडून बसणार आहे. दोन दिवसांत तुमच्या खंडण्या बंद करून सुरळीत पुरवठा जर नाही केला तर कोरोनाग्रस्त मातोश्रीवर येतील.”
राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. दररोज हजारोंच्या संख्येत कोरोनाबाधित आढळून येत आहेत, परिणामी आरोग्य यंत्रणेवरील भार वाढला आहे. रूग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह, रेमडेसिवीर इंजेक्शन आदींचा तुटवडा भासत आहे. यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत. असेही यावेळी खोत म्हणाले.
You must be logged in to post a comment.