न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू राहणार : सुशांत मोरे
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): झाडाणी तालुका महाबळेश्वर येथील अनधिकृत बांधकाम पाडणे व जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय देणे यासह सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील जंगलतोड खाणकाम,खोदकाम रोखणे या मागण्यांसाठी साताऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय उपोषण सुरू केले आहे . याप्रकरणी न्याय मिळेपर्यंत विविध माध्यमातून आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
झाडाणी प्रकरणांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सुशांत मोरे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्यासह दोघांना चौकशीची नोटीस बजावली आहे.तरीसुद्धा या प्रकरणातील शासकीय अधिकारी यांचा समावेश स्पष्ट व्हावा आणि शेतकऱ्यांना या प्रकरणात न्याय मिळावा याकरिता सुशांत मोरे यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे पुन्हा आंदोलन सुरू केले आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील वेळे, कोरणे,पाथरपुंज, खिरखिंडी, गोठणे आदी गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणे, बफरक्षेत्रातील गावांना अठरा प्रकारच्या नागरिक सुविधा उपलब्ध करून देणे, व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रातील जमीन खरेदी विक्री व्यवहाराची चौकशी करणे, कांदाटी खोऱ्यातील सोळा गावांना रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणे, नवजा तालुका पाटण येथील ओझर्डे धबधब्याचे व्यवस्थापन स्थानिक व समितीकडे सोपवणे, सह्याद्री व्याघ्र कोअर व राखीव क्षेत्रातील लोकांवर होणारे हिस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यांबद्दल तत्काळ मदत करणे व वासोटा किल्ला परिसरात प्लास्टिक संकलन केंद्राची उभारणी करणे अशा विविध मागण्या घेऊन प्रशांत मोरे उपोषणाला बसले आहेत.
याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना सादर केले आहे. याप्रकरणी तत्काळ मागण्या मान्य करण्यात याव्यात तसेच हा विषय मार्गी लागेपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन सुरू राहणार असल्याचे मोरे यांनी सांगितले आहे.
दरम्यान,या उपोषणास झाडाणी गावचे ग्रामस्थ रुमाजी मोरे, आनंद मोरे, बाबाजी मोरे, दिलीप मोरे आदींनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल घराल, अशोककुमार चव्हाण, दत्तात्रय पाटील, अनिकेत पाटणे, संदीप माने, विवेक कुऱ्हाडे, संदीप काळे, यांनी झाडाणी प्रकरणाची चौकशी करून कडक कारवाई करणेबाबत जिल्हाधिकारी यांना पत्र देवून श्री. मोरे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश उबाळे, माजी शिवसेना जिल्हा प्रमुख एकनाथ संकपाळ , सामाजिक कार्यकर्ते धनजय कदम, संजय चव्हाण , शिवसेनेचे कराड तालुकाध्यक्ष मनोज माळी, प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवाजी जाधव यांच्यासह अनेक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे.
You must be logged in to post a comment.