सातारा (भूमीशिल्प वृत्तसेवा) : भारत-चीन बॉर्डरवर गस्त घालत असताना सिक्किमध्ये भारतीय जवानांची गाडी बर्फावरून घसरुन दरीत कोसळली. रविवारी ही घटना घडली आहे. या घटनेत तीन जवान आणि जवानाच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे. सातारा तालुक्यातील चिंचनेर निंब येथील जवान सुजित किर्दत शहीद झाले आहेत.
सिक्कीम येथे सुजित किर्दत 106 इंजिनिअर रेजिमेंट ड्युटीवर होते. ड्युटी बजावत असताना बर्फावरुन जिप्सी गाडी घसरुन दरीत कोसळली यामध्ये किर्दत यांना वीरमरण आले आहे. सिक्कीममधील जवाहलाल नेहरु रोडवर नाथुलापासून 17 मैलावर जिप्सी दरीत कोसळली. अपघातात जखमी झालेल्या जवानांना कोलकाता येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहनातून जवानांचे मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
सुजित किर्दत यांच्या निधनाची माहिती कळताच चिंचणेर निंब गावावर शोककळा पसरली आहे.सुजित किर्दत यांचे पार्थिव मंगळवार(22 डिसेंबरला) चिंचणेरमध्ये येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. सुजित यांच्या पश्चात पत्नी,दोन लहान मुले, वडील,भाऊ असा परिवार आहे. चिंचणेर ग्रामस्थांनी सुजित किर्दत यांना अभिवादन करणारे फलक लावले आहेत.
You must be logged in to post a comment.