सोनगाव कचरा डेपो बाहेर कचर्‍याचे ढीग

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :  सातारा शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग पाहायला मिळत आहेत. शहरातील नागरी वस्तीत काही बेशिस्त नागरिक उघड्यावर कचरा टाकून जात असल्याचे नुकतेच निदर्शनास आले असतानाच नगरपालिकेचा कचरा डेपो असलेल्या सोनगाव येथेही कचरा ओव्हरफ्लो झाला आहे. कचरा डेपोतील कचरा संरक्षक भिंत व कचरा डेपोच्या प्रवेशद्वारा बाहेर आला असून या परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.         

सातारा शहरात मागील काही वर्षांपासून कचरा गंभीर प्रश्न बनत आहे. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये शहरातील अनेक ठिकाणच्या कचरा कुंड्या उचलण्यात आल्या. तसेच शहरातील कचरा उचलण्यासाठी घंडागाड्यांची सोय केली. मात्र, तरीही अनेक ठिकाणी नियमित कचरा उचलला जात नाही. लोकांनी शहरात मोक्याच्या ठिकाणी रस्त्याकडे कचरा टाकण्याच्या नवीन जागा निर्माण केल्या आहेत. त्यामुळे शहरात चौकाचौकात कचऱ्याचे ढिग दिसत आहेत. तसेच सध्या सातारा शहराची हद्दवाढ झाली आहे. शहरातील कचरा उचलण्याची पालिकेची जबाबदारी वाढली आहे.

पालिकेचा कचरा डेपो असलेल्या सोनगाव येथील कचरा डेपोमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या विरोधात अनेक वेळा सोनगाव व जकातवाडी ग्रामस्थांनी विविध प्रकारची आंदोलनेही केली आहेत. यावर पर्याय म्हणुन सातारा नगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन सारखा मोठा प्रकल्प सोनगाव कचरा डेपोत सुरू केला आहे. त्या प्रकल्पाचा भाग म्हणून कचर्‍याचे वर्गीकरण सुरू असून या कचर्‍याचे वर्गीकरण करताना योग्य ती खबरदारी प्रशासनाच्या वतीने घेताना दिसुन येत नाही. कचरा डेपोतील कचर्‍याचे वर्गीकरण करताना कचर्‍याचे ढीग लावले जात आहेत. कचर्‍याचे ढीग एवढ्या मोठ्या प्रमाणात लावले जात आहेत की त्या ढिगातील कचरा डेपोच्या बाहेर येऊन बोगदा – शेंद्रे रस्त्यालगत येत आहे. त्यामुळे कचर्‍यातील प्लॅस्टिक,घाण रस्त्यावर येत असल्याने परीसरात दुर्गंधी पसरली असून येथील स्थानिक नागरीकांना त्रास होऊ लागल्याने ते संतप्त झाले आहेत. याबाबत पालिकेने योग्य नियोजन करावे अन्यथा याबाबत आंदोलन करावे लागेल असा इशाराही येथील नागरिकांनी दिला आहे.

error: Content is protected !!