सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा पोलीस दलाने नेहमीच चांगले काम केले आहे. यापुढेही पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जोमाने काम करुन आपल्या कामाचा ठसा राज्यात उंचावेल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनिय कामगिरी व उत्कृष्ट सेवा केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विशेष सेवा पदकाने सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांचा सत्कार आज शिवतेज हॉलमध्ये गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या सत्कार समारंभास पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, यशराज देसाई आदी उपस्थित होते.
राज्य शासनाने पोलीसांसाठी अधिकच्या सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे. त्यांच्या राहण्याच्या घरांवर विशेष लक्ष केंद्रीत केले असून अर्थसंकल्पात भरीव तरतुद करण्यात आली आहे. पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी हे प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून आपले काम चोखपणे करीत असतात. लॉकडाऊनच्या काळातही आपल्या कुटुंबाची तमा न बाळगता रस्त्यावरती 24 तास काम केले. राज्याच्या सीमांचे तसेच गुंडांपासून समाजाचे संरक्षण करतात यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिला आहे.
पदकासाठी ठरवून दिलेल्या कोटा पद्धतीमुळे विशेष पोलीस पदकापासून अनेक चांगले अधिकारी, कर्मचारी वंचित राहिले आहेत. हा कोटा वाढविण्यासाठी विशेष बैठक घेतली जाईल, असेही गृह (राज्यमंत्री) श्री. देसाई यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजयकुमार बन्सल यांनी केले तर आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी केले. या कार्यक्रमास विशेष सेवा पदकाने सन्मानीत अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.