जिल्ह्यात ७ ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळे उघडणार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात कोव्हीड-१९ ची दुसरी लाट आटोक्यात येत असून अद्यापही आरोग्य यंत्रणेवर ताण येत असल्याने साथरोग अधिनियम, १८५७ च्या खंड २ नुसार प्राप्त अधिकार व आपत्ती निवारण कायदा, २००५ नुसार सक्षम प्राधिकारी म्हणून अध्यक्ष, राज्य व्यवस्थापन समितीने संपूर्ण राज्यासाठी निर्देश पारित केलेले आहेत. त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे कोव्हीडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून ०७ ऑक्टोबरपासुन खुली करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शेखर सिंह यांनी दिले आहेत.

प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळांच्या वेळेबाबत संबंधीत विश्वस्त, मंडळ, अधिकारी यांनी निर्णय घ्यावा. धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक एकत्र येत असतात, अशा ठिकाणी आवारात काहीच -१९ विषाणू संसर्ग रोखण्यासाठी योग्य सामाजिक अंतर व इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचे काटेकोरपणे पालन करणे महत्वाचे आहे. या आदेशामध्ये कोकोड -१९ विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या सामान्य प्रतिबंधात्मक उपायासोबतच या विशिष्ट ठिकाणी करावयाच्या विशिष्ट उपाययोजनांचा ही समावेश करण्यात आलेला आहे. कन्टेनमेंट झोनच्या आतील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे ही नागरिकांसाठी बंद राहतील. फक्त कंन्टेनमेंट झोनच्या बाहेरील स्थळे, प्रार्थना स्थळे सुरु करण्यातस परवानगी असेल. मास्क परिधान करणे, शारिरिक आंतराचे पालन करणे, धर्मल स्क्रिनिंग करणे आणि वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.

६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक, इतर आजाराने ग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला आणि १० वर्षाखालील लहान मुले यांनी घरीच राहावे, धार्मिक / प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्था यांनी याबाबत नागरिकांना सूचना द्याव्यात. कोविड विषाणू संसर्गाच्या सामान्य प्रतिबंधात्मक उपाययोजना बरोबरच साध्या सार्वजनिक आरोग्य उपायांचेही पालन करणे आवश्यक आहे. या सर्व उपायांचे पालन सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे या ठिकाणी सर्व कामगार, सेवेकरी, अभ्यागत, भाविक यांचेकडून पूर्ण वेळ पालन करणे बंधनकारक आहे. यामध्ये खालील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा समावेश असेल.


या सर्व सार्वजनिक ठिकाणी शक्यतोवर वैयक्तिक कमीत कमी ६ फूट शारिरिक अंतर राखणे आवश्यक असेल. चेहरापट्टी, मास्क यांचा वापर करणे बंधनकारक असेल. हात अस्वच्छ नसले तरी साबणाने वारंवार हात धुणे ( किमान – ४० ते ६० सेंकदापर्यंत) बंधनकारक असेल, त्याचबरोबर सर्व ठिकाणी अल्कोहोल युक्त हण्ड सॅनिटायझर चा वापर ( किमान २० सेंकदापर्यत) करावा. श्वसनसंबंधित शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. यामध्ये शिकताना किंवा खोकताना टिश्यू पेपर किंवा हातरूमाल किंवा हाताच्या कोपराने नाक व तोंड पूर्णपणे झाकले जाईल याची दक्षता घेणे तसेच वापरलेल्या टिश्यू पेपरची योग्य त्या पध्दतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. या ठिकाणी येणाऱ्या सर्व नागरिक,कामगार, भाविक, सेवेकरी यांनी स्वत:च्या आरोग्याचे निरिक्षण करणे तसेच आजारी असल्यास स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासनास कळविणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल. तसेच याचे उल्लघन केल्यास स्थानिक प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाईल. धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे या ठिकाणी येणाऱ्या सर्वांनी आरोग्य सेतु अॅपचा वापर करावा.

error: Content is protected !!