संत निरंकारी मिशन पुणे झोन आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे,(भूमिशिल्प वृत्तसेवा): पुणे झोन मधील शाखा वारजे अंतर्गत संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन १३ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या शिबिरात २७३ रक्तदात्यांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले.यावेळी पिंपरी येथील वाय.सी.एम. रुग्णालयाच्या रक्तपेढीकडून रक्तसंकलन करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन पुणे झोनल प्रमुख ताराचंद करमचंदानी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या रक्तदान शिबिरास जिल्हा प्रमुख शिवसेना रमेश कोंडे, सामाजिक कार्यकर्ते पराग ढेणे तसेच नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर १९८६ मध्ये संत निरंकारी समागमामध्ये करण्यात आले होते, या शिबिराचे उद्घाटन बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी केले होते. ही मोहीम मिशनच्या अनुयायांद्वारे मागील ३६ वर्षांपासून निरंतर अशीच चालू असून आतापर्यंत ७४७३ रक्तदान शिबीरे संपन्न झाली आहेत तर १२,३२,४९७ युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे.

बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.

संत निरंकारी मिशनद्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.

गेल्या १५ दिवसांपासून मिशनचे सेवादारद्वारे वारजे माळवाडी, उत्तमनगर परिसरामध्ये रक्तदानाची जनजागृती करण्यात आली.

रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशनचे अनुयायी यांचे योगदान लाभले. सर्व रक्तदात्यांचे, उपस्थित मान्यवरांचे वारजे शाखा प्रमुख विजय कदम यांनी आभार मानले.

error: Content is protected !!