श्रीनिवास पाटलांनी लोकसभेत राष्ट्रीय महामार्गच्या प्रलंबित कामांकडे लक्ष वेधले

सातारा (भूमीशिल्प वृत्तसेवा) : लोकसभेत सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गच्या प्रलंबित कामांकडे खासदार श्रीनिवास पाटील यांनी लक्ष वेधून आवश्यक असणाऱ्या विविध मागण्या सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाच्या नियंत्रणातील अनुदान मागणी चर्चेवेळी बोलताना केल्या.
पाटण शहराजवळील केरा नदीवर बांधण्यात येत असलेल्या पूलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. गेल्या दोनतीन वर्षापासून हे काम अपूर्ण अवस्थेत असून ते काम लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी यावेळी केली.

विजापूर ते गुहागर मार्गावरील कराड शहराजवळ कृष्णा नदीवर असणा-या पूलाचे काम देखील दोनतीन वर्षापासून सुरू आहे. मात्र ते काम अद्याप अपूर्ण असून त्या कामाला गती द्यावी.
टोलनाक्याच्या २० किमी अंतरामधील नागरिकांना टोलची सवलत मिळावी. तेथील स्थानिक रहिवाशी, व्यापाऱ्यांना ये-जा करण्यासाठी पास दिले जातात. परंतु ती सुविधा काही लोकांनाच मिळते तर कित्येकजण त्यापासून वंचित राहत आहे. त्यामुळे संबंधित प्रत्येक व्यक्तीला सवलतीचा लाभ मिळण्यासाठी अशी एखादी व्यवस्था निर्माण करावी जेणे करून त्याची सुविधा त्यांना घेता येईल.
महामार्गाच्या सुधारीत कामामुळे रस्त्याची उंची वाढत असून दुतर्फा असलेल्या जमिनीची पातळी खाली राहत आहे. परिणामी पावसाळ्यात पडणारे पाणी रस्त्यांच्या गटारात न जाता ते आजूबाजूच्या शेतामध्ये साचून राहत आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी व रहिवासी नागरिकांना अडचणी निर्माण होत असून शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्या पाण्याचा योग्य निचरा होण्याची व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.
खंबाटकी घाटाला महामार्गावर दोन पर्यायी बोगदे तयार होत आहेत. मात्र मार्गामुळे त्या परिसरातील वेळे हे गाव दोन्ही दिशेला विभागले गेले आहे. त्याठिकाणी रस्ता ओलांडताना नियमित अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे तेथे पूल बांधला गेल्यास अशा होणा-या अपघातांना आळा बसेल. तसेच पारगाव येथे देखील अशीच परिस्थिती असून त्याठिकाणी देखील पूल बांधण्यात यावा.
राष्ट्रीय महामार्गावर पथदिवे लावण्यात आले आहेत. मात्र ते दिवे रात्रीच्यावेळी बंद असतात. ते पथदिवे का बंद अवस्थेत असतात त्याची चौकशी करून ते सुरू करण्यात यावेत.
महामार्ग सोडून गावाकडे जाणा-या वळणावर हायमास्ट दिवे बसवण्यात आले तर त्या ठिकाणी होणारे अपघात टाळता येतील. तसेच महामार्गावरील प्रवाशांसाठी शौचालयाची सुविधा करणे आवश्यक आहे. त्यासाठी महिला व पुरुषांसाठी वेगवेगळी शौचालय बांधण्यात यावीत अशी मागणी केली.
महामार्गाच्या कामाचा ठेका हा मोठमोठ्या कंपन्याकडून घेतला जातो. मात्र संबंधित मुख्य ठेकेदार हे पोट ठेकेदार नेमून त्यांच्याकडून रस्त्याची काम करून घेतात. परंतु त्यांच्याकडून दोन-पाच किलोमीटर अतंराचे काम तुकड्यातुकड्यात होत अल्यामुळे कामाचा दर्जा खालावत असून काम चांगले पद्धतीने होत नाही. त्यामुळे मुख्य ठेकेदारानेच आपली यंत्रणा वाढवून ते काम योग्यरीत्या दर्जेदारपणे पूर्ण करावे अशी सूचना करण्यात यावी अशी विनंती केली.
खेडशिवापूर, आणेवाडी टोलनाक्यावर सतत कोंडी होत असल्याने महामार्गावर लांबचलांब रांगा लागत आहेत. टोलनाक्यावरील गर्दी टाळण्यासाठी त्याठिकाणी सुधारीत यंत्रणा बसवून सुविधा निर्माण करावी म्हणजे प्रवाशांची गैरसोय होणार नाही असे सुचवले.
पोलादपूर ते सुरूर हा मार्ग मुंबई-गोवा आणि पुणे-बेंगलोर मार्गाला जोडत असतो. त्या मार्गाचा दर्जा वाढवला आहे, मात्र त्या कामात सुधारणा होणे आवश्यक आहे. महाबळेश्वर, पाचगणी ही शहरे त्या मार्गावर येत असल्याने तेथे जाणा-या पर्यटकांना त्यामुळे सुविधा मिळेल.
दरम्यान रस्ते व परिवहन मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार त्यांच्या सूचनेवरून लोणंद ते आदर्की मार्गाचे काम उत्तम झाले आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन आभार मानले.

error: Content is protected !!