सातारा – रत्नागिरी बससेवा तत्काळ सुरू करा; सुहास राजेशिर्के यांची मागणी

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा – रत्नागिरी बस कोरोना काळात बंद करण्यात आली होती. ही बससेवा आगामी गौरी-गणपतीचा हंगाम लक्षात घेऊन तत्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. दरम्यान , सातारा आगाराचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी तत्काळ सदर मागणीची दखल घेत लवकरच सातारा-रत्नागिरी ही बससेवा सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.

निवेदनात म्हटले आहे की,कोरोना काळापूर्वी सातारा-रत्नागिरी ही बस उंब्रज मार्गे सुरु होती.या मार्गावरील एसटी बसचे उत्पन्नही सातारा आगाराला चांगल्या पद्धतीने मिळत होते.मात्र गेल्या दोन वर्षापासून ही बस बंद करण्यात आली आहे .सातारा शहरांमध्ये कोकणामध्ये जाणारे नागरिक मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांना रत्नागिरीला आगामी गौरी गणपतीच्या सणासाठी जाण्याकरता कोणतीही बस उपलब्ध नाही तसेच या मार्गावरील एसटीचे आरक्षण सुद्धा उपलब्ध होत नाही.त्यामूळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे शेवटी निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान,सातारा-रत्नागिरी एसटी बस गौरी गणपती सणाच्या पूर्वी सुरू न झाल्यास कोकणात गौरी गणपतींसाठी जाऊ इच्छिणाऱ्या वयोवृद्धांसह सर्व नागरिकांची गैरसोय होणार आहे .त्यामुळे सातारा-रत्नागिरी बस तातडीने सुरू करावी अशी मागणी सुहास राजेशिर्के यांनी विभाग नियंत्रक पलंगे यांच्यासमोर केली.यावेळी विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी सातारा-रत्नागिरी ही एसटी बस तत्काळ सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले .

यावेळी भालचंद्र घेताळ, वसंतराव डिके, दत्तात्रय चाळके, रामभाऊ तिखे, विष्णू धावडे, तसेच सातारा आगार व्यवस्थापक ज्योती गायकवाड आदी उपस्थित होते.

खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी नागरिकांची अडचण ओळखून यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार आम्ही सर्व नागरिकांनी आगारप्रमुखांची भेट घेऊन सदरची मागणी केली.आमच्या मागणीची दखल घेत एसटी प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला याबद्दल समाधानी आहे.
– सुहास राजेशिर्के, माजी उपनगराध्यक्ष, सातारा नगरपरिषद, सातारा.

error: Content is protected !!