सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा)- सातारा जिल्ह्याच्यादृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या मेडीकल कॉलेज उभारणीसाठी मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून कॉलेजच्या जागा हस्तांतरणानंतर आता १०० विध्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय उभारणीसाठी एकूण ४९५ कोटी ४६ लाख एवढ्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
गेले अनेक दिवसांपासून सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न गाजत होता. मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून सातारा जिल्ह्याचा मेडीकल कॉलेजचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी वाढीव जागा हस्तांतरणाचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. ना. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वाढीव ६० एकर जागा हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ६१ कोटी रुपये निधीची तरतूदही करण्यात आली होती. दरम्यान, जागेसह संपूर्ण मेडिकल कॉलेज उभारणीसाठी निधीची तरतूद व्हावी आणि त्यासाठी प्रशासकीय मान्यता देऊन मेडिकल कॉलेजचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी केली होती.
अजित पवार यांनी प्राधान्य देत सातारच्या मेडिकल कॉलेजचा प्रश्न निकाली काढला. ना. अजित पवार आणि वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेवरून सातारा येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय उभारणी व अनुषांगिकबांधकामाच्या अंदाजपत्रकास महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मान्यता दिली असून त्यासाठी एकूण ४९५ कोटी ४६ लाख एवढ्या निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे जिल्हावासियांच्या मेडिकल कॉलेजचे स्वप्न आता सत्यात उतारण्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. लवकरच निविदा प्रक्रिया आणि इतर प्रशासकीय सोपस्कार पूर्ण होऊन प्रत्यक्ष मेडिकल कॉलेज उभारणीला प्रारंभ होणार आहे.
You must be logged in to post a comment.