सातारा,(अजित जगताप यांजकडून) : बुधवारी सायंकाळी सातारचे नूतन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची भेट घेऊन शेतकरी संघटनेचे पहिले दोन निवेदन देण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
सातारचे निवासी उपजिल्हाधिकारी पदी कार्यरत असलेले श्री. नागेश पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शेतकरी संघटनेच्या क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेड जिल्हाध्यक्ष विजय पाटील, धन्यकुमार जाधव, संपत साळुंखे ,अशोकराव पाटील, शांताराम बाबर सर, वसंतराव चव्हाण, सदाशिव कार्वेकर यांनी आज वन्य प्राण्यांचे मुक्त वावर असल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान तसेच राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधील आर्थिक घोटाळा याबाबत चौकशी करावी .अशी मागणी करणारे निवेदन दिले. तसेच नूतन निवासी उपजिल्हाधिकारी श्री.पाटील यांचे संघटनेच्यावतीने स्वागत करण्यात आले.
सातारच्या नूतन निवासी उपजिल्हाधिकारी पदी श्री.पाटील यांची निवड झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकरी संघटनेच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. कारण सांगली जिल्ह्यामध्ये सक्षम अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेने आज दुष्काळाची झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकावर सध्या वन्य प्राणी तरस, लांडगे, गवे, वानर ,बिबटे यांचा वावर सुरू झाल्यामुळे पाळीव प्राण्यावर हल्ले वाढलेले आहेत. शेतमजूर व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
कराड तालुक्यातील काले , आटके येवती, उंडाळे, शेवाळवाडी, घोलपवाडी, गायकवाडी, पाडळी, कोरेगाव तालुक्यातील बनवडी ,दुधनवाडी या भागातही वन्य प्राण्यांचा वावर वाढलेला आहे. शेतकऱ्यांचा पाळीव प्राणी असलेल्या म्हैस , गाय,बैल, कोंबड्या, कुत्रे यांच्यावर हल्ले होऊ लागलेले आहेत .वन्य प्राण्यांना जगण्याचा अधिकार आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या पिकाची नुकसान करणे तसेच उभ्या पिकामध्ये वन्य प्राणी जात असल्यामुळे शेतमजूर व शेतकऱ्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे ज्यांना वन्य प्राण्यांची काळजी आहे. अशा व्यक्तींना वन्य प्राणी दत्तक घेऊन त्यांचे पालन पोषण करावे. असेही खेदाने शेतकरी संघटनेचे विजय पाटील यांनी नमूद केलेले आहे.
त्याचबरोबर सध्या सरकार मान्य रास्त भाव दुकानातून मोठ्या प्रमाणात शासकीय धान्याचा पुरवठा होत असला तरी स्वस्त धान्य दुकानदार हे त्याचा अपहरण करीत आहेत.काही कर्मचारी व अधिकाऱ्यांची हात ओले करून मॅनेज करत आहेत. त्यामुळे शासकीय रास्त भाव दुकानदार व पुरवठा विभागातील भ्रष्ट मार्गाने काही अधिकार्यांची संपत्ती वाढू लागलेली आहे. दुसऱ्या बाजूला खरे लाभार्थी असणाऱ्या व्यक्तींना तेल, साखर, गहू, तांदूळ, डाळ अशी जगण्यासाठी आवश्यक असणारे धान्य पुरवठा होऊ शकलेले नाही. त्यामुळे सदर गोष्टींची चौकशी करावी अन्यथा ३० ऑक्टोबर रोजी मंत्रालयासमोर आमरण उपोषण केले जाईल. असाही इशारा आबासाहेब तथा संपत साळुंखे यांनी दिलेला आहे. त्याचेही निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलेले आहे. या वेळेला चौकशीनंतर कारवाई करण्यात येईल. अशी आशा पल्लवीत झालेली आहे.
You must be logged in to post a comment.