घऱाबाहेर न पडता सरत्या वर्षाला निरोप द्या : शेखर सिंह

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – कोरोना विषाणूंचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखणेचे अनुषंगाने सातारा जिल्हयात 31 डिसेंबर, 2020 व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साध्या पध्दतीने व शासनाने वेळोवेळी दिलेले नियमांचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन करणे आवश्यकअसून त्याबाबत आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी निर्गमित केले आहेत. क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार, मला प्राप्त असलेल्या अधिकारान्वये,  दिनांक 31 डिसेंबर 2020  रोजीचे 13.00  वाजले  पासून ते 1 जानेवारी 2021  रोजीचे 24.00 वाजेपर्यंत पुढील प्रमाणे आदेश जारी करीत आहे.

कोरोनाच्या अनुषंगाने दि. 31 डिसेंबर, 2020 रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व 1 जानेवारी, 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच साधेपणाने साजरे करावे. डिसेंबरच्या दिवशी नागरीकांनी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठया संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणेचे आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.

नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खवरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. कोविड- 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन.आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील.


 सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास त्यांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनीय / कायदेशीर कारवाई पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी करावी.

error: Content is protected !!