लॉकडाऊन सर्वसामान्य जनतेच्या अंगावर शहारा आणणारा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : तब्बल एका वर्षामध्ये सातारा शहरासह तालुक्‍यात झालेले लॉकडाऊन सर्वसामान्य जनतेच्या अंगावर शहारा आणणारा ठरलेला आहे. अतिशय कडक निर्बंध आणि विविध अशा अडचणींना तोंड देत सर्वसामान्यांच्या नाकीनऊ केले होते. वर्षभरानंतर सातारा जिल्ह्यात एकूण 62875 एवढी रुग्ण संख्या झाली असून यापैकी 58582  रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.तसेच अजूनही 2404 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर 1889 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.

कोरोना हा परदेशातून भारतात प्रवेश केल्यामुळे नागरिकांमध्ये अगोदरच भीती होती त्यातच साताऱ्यातही सापडलेला पहिला रुग्ण दुबईहून आला होता. त्यामुळे नागरिक आणखीनच अस्वस्थ झाले होते. या महिलेच्या अहवालानंतर दोन दिवसात तिच्या पतीलाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. हळूहळू एकाचे दोन अशी रुग्ण संख्या वाढू लागल्यानंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात येणारे रस्ते पूर्णपणे बंद केले. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत होता. सुरुवातीला कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने फ्ल्यूच्या गोळ्या रुग्णांना दिल्या जात होत्या. तर दुसरीकडे कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून प्रचंड खबरदारी घेतली जात होती. रस्त्यावर कोणालाही फिरकू दिले जात नव्हते. तोंडाला मास्क न लावणाऱ्यावर प्रसंगी पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला. केवळ कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासनाकडून प्रयत्न केले गेले. मात्र त्यानंतरही वर्षभर कोरोनाची रुग्ण संख्या मात्र कमी झाली नाही.

तीव्र लॉकडाऊनच्या काळामध्ये सातारा जिल्हयात विविध व्यवसाय ठप्प झाले होते. मात्र, विविध सामाजिक संस्था व त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरभर व पायी येणाऱ्या बाहेरील राज्यातील प्रवाशांची तसेच विविध रुग्णालयातील रुग्णांसाठी मोफत अन्न खाऊ घालण्याची योजना व केलेली व्यवस्था हे एक वैशिष्ट्य ठरले आहे. मागील वर्षी कोरोनाची असलेली भयंकर भीती गेल्या वर्षभरात मात्र निवळून गेली असून सर्वसामान्य जनता आपल्या उद्योग व्यवसायाला लागलेली आहे. आजही विविध निर्बंध असले तरी भीती मात्र कमी झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

error: Content is protected !!