मुली, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा करा : डॉ. शुभा फरांदे-पाध्ये

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पळसावडे (ता. सातारा) येथे गर्भवती वनरक्षक महिलेला व तिच्या पतीला झालेल्या मारहाणी बाबत पूर्ण तपास करून मुली, महिलांवर अत्याचार करणार्यांना कडक शिक्षा करा अशी मागणी भाजपच्या बेटी बचाओ बेटी पढाओच्या संयोजिका डॉ. शुभा फरांदे-पाध्ये यांनी मा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली

निवेदनात लिहिले आहे की, पळसावडे (ता. सातारा) येथे गर्भवती वनरक्षक असलेल्या सिंधू बाजीराव सानप या महिलेला व तिच्या पतीला, माजी सरपंच रामचंद्र गंगाराम जानकर व प्रतिभा जानकर (दोघेही रा. पळसावडे) तसेच त्याच्या पत्नीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.

दि. १७ रोजी सकाळी नऊ वाजता पळसावडे येथे आरोपी प्रतिभा जानकर हिने तक्रारदार सिंधू सानप यांना ‘तू कामावरील बायका का घेऊन गेलीस, असे म्हणत थोबाडीत मारत वाद घातला होता. यानंतर दि. १८ रोजी दुपारी पुन्हा संशयित महिलेने फोन करून ‘तू वनक्षेत्रात यायचे नाही. आलीस तर मारेन,’ असे म्हणत दमदाटी, शिवीगाळ केली. दि. १९ रोजी सकाळी ८ वाजता तक्रारदार व त्यांचे वनरक्षक पती काम करत असताना तेथे संशयित आरोपी पती व पत्नी आले. संशयितांनी पुन्हा वाद घालत थेट तक्रारदार व त्यांच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तक्रारदार या गर्भवती असतानाही त्यांना मारहाण करण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. सदर आरोपी हा वनसंरक्षक समितीमधील समन्वयक असून त्याने केलेले सदर कृत्य अत्यंत घृणास्पद व निंदनिय आहे. सदर आरोपी यांनी दगडाने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी यावेळी दिली.

या घटनेमुळे संतापाची लाट निर्माण झाली असून, सातारा तालुका पोलिस ठाण्यात मारकुट्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तरी सदर पोलीस तपासाच्या कामी शासकीय सेवा बजावत असणाऱ्या कर्मचाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या अनुषंगाने जीवे मारण्याचा प्रयत्न. स्त्री गर्भातील अर्भकाचे जीवितास धोका निर्माण होईल वगैरे विषयाच्या अनुषंगाने गंभीर गुन्हा घडलेला आहे. तरी सदर गुन्हयाचे कामी भारतीय दंड संहिता कलम ३०७, ३५३, ३५४ए, ३४ व अन्य आवश्यक कलमांच्या अन्वये गुन्हा दाखल होवून सदर आरोपीस कडक शासन व्हावे.अशी मागणी निवेदनात केली आहे.

डॉ पाध्ये पुढे म्हणाल्या, सदर घटना निंदनिय असून शासकीय सेवा करणाऱ्या सावित्रीच्या लेकी सुरक्षित नाहीत हे सिध्द होते. राज्य सरकार या अनुषंगाने कोणतीही भूमिका स्पष्ट करत नाही. पोलीस अधिकारी यांनी सदर गुन्हयाची तिव्र दखल घेवून कोणताही राजकीय हस्तक्षेप न जुमानता आरोपीस कडक शासन होईल असा तपास करावा.

कारणपरत्वे प्रस्तुत घटनेचे गांभीर्य व महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा समजून आपण सदर आरोपी यांच्या विरूध्द योग्यत्या दंडनिय कलमांच्या अनुषंगाने गुन्ह्याचे कामी सत्वर कायदेशीर कारवाई करावी ही अपेक्षा. अन्यथा सदर प्रश्नी भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल तसेच त्या आंदोलनाची झळ देशपातळी पर्यंत प्रशासनास भोगावी लागेल याची दखल घ्यावी.असा इशारा भारतीय जनता पार्टीने दिला आहे

यावेळी ,मनीषा पांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बेटी बचाओ, बेटी पढाओ आघाडी,अश्विनी हुबळीकर, जिल्हाध्यक्ष बेटी बचाओ बेटी पढाओ सातारा,श्री विकास गोसावी, शहराध्यक्ष,श्री विठ्ठल बलशेटवार जिल्हा सरचिटणीस सौ संध्या निकुंभ,ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष सातारा,,सौ वनिता पवार,ओबीसी युवती जिल्हाध्यक्ष,श्री किरण जाधव बेटी बचाओ बेटी पढाओ फलटण समन्वयक,सौ रीना भणगे, ऍड जागृती ससाणे, सौ मनीषा जाधव श्री विक्रम बोराटे युवा मोर्चा सातारा शहराध्यक्ष,व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

error: Content is protected !!