ग्रेडसेप्रेटरमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात यावी, यासाठी पोवई नाक्यावर ग्रेडसेप्रेटर (भुयारी मार्ग) उभारण्यात आला. हा भुयारी मार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, त्याचा गैरफायदा घेऊन काही स्टंटबाज या भुयारी मार्गातून बाईकची स्टंटबाजी करताना आढळून आले. अशा स्टंटबाजांवर सातारा शहर पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखून कारवाई केली.

काही दिवसांपूर्वी पोवई नाक्यावरील भुयारी मार्ग सर्वांसाठी खुला करण्यात आला. मात्र, अद्याप या भुयारी मार्गातून म्हणावी, अशी वाहतूक होत नाही. येथून वाहनांची अतिशय कमी वर्दळ असल्याने काही युवक बाईकवर साहसी स्टंट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचा व्हिडिओ एका तरुणाने आपल्या सोशल मिडियाच्या प्रोफाईलवर शेअर केला. त्याला काही वेळात शेकडो लाईक आणि कमेंटन्स मिळाल्याने त्याचा हुरूप वाढला आहे. त्याचे अनुकरण करून इतरही स्टंटबाज अशाच पध्दतीने स्टंटबाजी करताना दिसत आहेत.

त्याची प्रसारमाध्यमांनी दखल घेतल्यानंतर सातारा पोलिसांनी कारवाई करण्याबाबतची भूमिका घेतली. पोलिसांनी ज्या ज्या युवकांनी आपल्या सोशल मिडियावर अशा प्रकारचे व्हिडिओ अथवा फोटो शेअर केले. अशा लोकांचा शोध घेऊन त्यांना पोलीस खाक्या दाखवला. ऋतुराज राजेंद्र करंजे (वय २७, रा. दौलतनगर, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची फिर्याद पोलीस कर्मचारी सूरज रेळेकर यांनी दिली आहे. दरम्यान, उद्यापासून पोलीस अशा प्रकारे भुयारी मार्गामध्ये केलेल्या जाणाऱ्या स्टंटबाजीवर वाॅच ठेवून कडक कारवाई करणार आहेत. याबाबत बोलताना सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे म्हणाले, स्टंटबाजी करीत असताना युवकांनी स्वतःसोबत इतरांचा जीव धोक्यात घालू नये. अशा प्रकारे वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी असे कोणी स्टंटबाजी करत असेल तर शहर पोलीस स्टेशनमध्ये कळवावे,असे आवाहन मांजरे यांनी केले आहे.

error: Content is protected !!