शिवसागर जलाशयातील बंद बोटिंग व्यवसायाबाबत प्रस्ताव सादर करा :ना. शंभूराज देसाई

मुंबई, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शिवसागर जलाशयातील बंद असलेला बोटिंग व्यवसाय सुरू करणाऱ्या साठी गृह, वन आणि जलसंपदा विभागांनी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री(ग्रामीण ) शंभूराज देसाई यांनी दिले.

         शिवसागर जलाशयातील बंद असलेला बोटिंग व्यवसाय सुरू करण्याबाबत आढावा बैठक मंत्रालयात झाली त्यावेळी श्री. देसाई बोलत होते.श्री देसाई म्हणाले, कोयना जलाशय परिसर हा १९७२ च्या अधिसूचनेद्वारे प्रतिसिद्ध क्षेत्र म्हणून प्रतिबंधीत असल्याचे जाहीर करण्यात आले होते. याबाबत हे क्षेत्र प्रतिसिद्ध क्षेत्रातून वगळण्याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने गृह विभागाकडे मंत्रालय स्तरावर तात्काळ सादर करावा. याबाबत दोन्ही विभागांनी सहमती दर्शविली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील मंजूर व्याघ्र संवर्धन आराखड्यातील निसर्ग पर्यटन आराखड्यानुसार कोयना जलाशयातील मार्ग जलवाहतूकीस मंजूर करण्यात आले असलेचे व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी यांनी स्पष्ट केले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पचा जलवाहतूकीस अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी देण्यास काही अडचण नसल्याचे श्री.देसाई यांनी स्पष्ट केले.वन्यजीव विभाग व जलसंपदा विभाग यांनी स्थानिक नागरिकांना यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही श्री. देसाई यांनी दिले.

धरणाच्या सुरक्षिततेला कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दक्षता घ्यावी. आवश्यक मनुष्यबळासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ यांचेकडे गरज असेल तर मागणी करावी. असे निर्देश गृह विभागास देण्यात आले आहेत. वन्यजीव, जलसंपदा, गृह विभागाने याबाबत तात्काळ कार्यवाही करणेबाबतच्या सूचना संबंधितांना श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या. सन २००३ च्या जलसंपदा विभागाच्या शासन निर्णयात आवश्यक ते बदल प्रस्तावित असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) सुहास वारके, गृह विभागाचे प्रधान सचिव विनीत अग्रवाल, राज्य गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी सातारा शेखर सिंह , जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा अजय बन्सल , उपसंचालक, वन्य जीव  (सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ) आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!