सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पडळ, ता. खटाव येथील खटाव माण साखर कारखान्यातील अधिकाऱ्याचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. साखर कारखान्यातील साखरेची अफरातफर केल्याचा आरोपातून हा प्रकार घडला. या प्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे यांच्यासह 19 जणांवर 302 कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.
पडळ येथील के. एम. शुगर कारखान्यांमध्ये प्रोसेसिंग हेड म्हणून कार्यरत असणाऱ्या जगदीप थोरात या अधिकाऱ्याला 10 मार्चला कारखान्यात साखरेची अफरातफर केल्याच्या आरोपावरून मारहाण करण्यात आली होती. यानंतर जगदीप थोरात यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाईकांनी मारहाण करणार्या संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मृतदेह वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन गोवारे येथे अंत्यसंस्कार केले.
याप्रकरणी कारखान्याचे चेअरमन आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, को चेअरमन जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, मुख्यकार्यकारी अधिकारी संग्राम घोरपडे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर कलम 302 अंतर्गत वडूज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील को. चेअरमन मनोज घोरपडे यांच्यासह 6 जणांना अटक करण्यात आली आहे
You must be logged in to post a comment.