सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा)’: कोरोना महामारीच्या काळात ‘कोविड – १९’ लसीकरणाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी म्हणून सातारा शहराच्या पश्चिम भागात आम्ही जगजागृतीचे फलक लावले. त्याचा तुम्हाला पोटशुळ उठला आहे. हे आम्हाला माहित आहे. तुम्ही आमच्या जनजागृतीला पोष्टरबाजी म्हणत असालतर तुम्ही नैराश्यात गेला आहे, हे स्पष्ट झाले आहे. तुम्हाला आता उपचारपध्दती बदलावी लागणार आहे. तुमच्या चमकोगिरीला सातारकर वैतागले आहेत. कोरोना महामारीत कोणी किती काम केले याची माहिती घ्या. तुम्ही या काळात कोरोना होईल म्हणून घरात लपून बसला होता. आम्ही फिल्डवर होतो. लोकांना मदत करत होतो. त्याची माध्यमानीही दखल घेतली आहे. त्यामुळे तुम्ही आता तुमची चमकोगिरी थांबवा आणि विरोधी पक्षनेते असल्यासारखे वागा,’ असा टोला माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी लगावला आहे.
साताऱ्यातील कोरोना परिस्थिती व डेंग्यूबाबत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबत नगरपालिकेचे विरोधीपक्ष नेते अशोक मोने यांनी सत्ताधारी सातारा विकास आघाडीवर तोंडसुख घेतले आहे. त्या अनुषंगाने माजी उपनगराध्यक्ष आणि सातारा विकास आघाडीचे नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी मोने यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘कोरोना महामारीत कोण फ्रंटवर होते आणि कोण जनतेत होते. ते संपूर्ण साताऱ्याला माहित आहे. तुम्ही विरोधी पक्षनेते असताना पालिकेत फिरकलाही नाही. कोरोनाच्या भीतीने घरातून बाहेर पडलाच नाही. कोण लोकांमध्ये होते, लोकांना कोण मदत करत होते, याची जरा माहिती घ्या म्हणजे तुम्हाला थोडे बरे वाटेल. आगाऊ ऑनलाईन नोंदणीमुळे सर्वसामान्यांना लस लवकर उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे मी स्वत: जिल्हाधिकारी शेखर सिंग आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना भेटलो. त्यांना निवेदन दिले आणि सातारा शहरात लसीकरण करण्यासाठी उपाययोजना आखाव्यात आणि शक्य झाले तर ‘ऑन दी स्पॉट’ नोंदणी व लसीकरण सुरु करावे, अशी मागणी केली होती. त्याची दखल तत्काळ घेण्यात आली. त्याचबरोबर डेंग्यूबाबत जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना भेटून व्यापक जनजागृतीची मोहीम सर्वप्रथम मी सुरु केली. त्याचे पुरावे तुम्हाला हवे तर आम्ही पोहोच करतो.’
कोरोना महामारीतील उपाययोजनांच्या अनुषंगाने आम्ही प्रशासनाकडे जी मागणी केली, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगून राजेशिर्के यांनी म्हटले आहे की, ‘कोविड-१९’ लसीकरण काळाची गरज आहे. त्याची माहिती लोकांना जनजागृती करुन दिली म्हणून तुमच्या पोटात दुखण्याची आवश्यकता नाही. लोकांना माहिती व्हावी म्हणून शहराच्या पश्चिम भागात तीन ठिकाणी माहितीपर फ्लेक्स लावले, तर यात गैर काय आहे. लोकांपर्यंत प्रभावीपणे माहिती पोहोचावी हाच त्यामागे उद्देश आहे. आम्ही तुमच्यासारखे राजकारण करत नाही. कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी समाजमाध्यमाचा आधार घेतला आहे. त्यातून लसीकरण पूर्ण केले. आमच्या पश्चिम भागातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्याचीच अमंलबजावणी केली. याला जर तुम्ही शो बाजी अथवा बॅनरबाजी म्हणत असाल तर तुम्ही नैराश्यात गेला आहे, असा त्याचा अर्थ होतो.’असेही राजेशिर्के यांनी पत्रकात म्हटले आहे
You must be logged in to post a comment.