सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाकाळात हातावरचे पोट असणारे मजूर आणि गरीबांची होणारी उपासमार रोखण्यासाठी मदतीसाठी जे हात पुढे आले, त्यात माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सुहास राजेशिर्के व त्यांचे चिरंजीव शंभू राजेशिर्केचा प्राधान्याने समावेश करावा लागेल. भयग्रस्त वातावरणात सर्वजण चार भिंतीत बसले असतानाच शिर्के कुटुंबीय मात्र कोणतीही भीती न बाळगता गरजूंच्या दारात पोहोचले. अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून राजेशिर्के कुटुबीयांनी सामाजिक उत्तरदायित्व निभावले आहे.
कोरोनाचा प्रसार आणि त्यापाठोपाठ आलेला लॉकडाउन यामुळे वर्षभरापासून अनेकांचे पोटही लॉकडाउन झाले. अनेकांनी रोजगार गमावला. इच्छा असून काम नाही आणि पोटालाही मिळत नाही, अशा अवस्थेतील गरीब माणसाला जगण्यासाठी कोरोनाकाळात अनेक हात पुढे सरसावले. सुहास राजेशिर्के यांनी माणुसकीच्या भावनेतून अशा निराधारांची घरी जाऊन आपुलकीने विचारपूस केली. त्यांना आर्थिक आणि वस्तुरूपात मदत केली. त्यांचे चिरंजीव शंभू यांनीही पित्याचा कित्ता गिरवत सॅनिटायझरपासून साबणार्यंत आणि अन्नधान्यापासून जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सर्वकाही गरीबांच्या दारत पोहोचविले. रस्त्यावर पथारी मांडून बसलेले चर्मकार, घंटागाडीवर काम करणारे, शहरातील सफाई कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून त्यांनी मदतीचा हात दिला. पोवई नाका, समर्थ मंदिर, जकातवाडी कचरा डेपो, माहुलीची कैलाश स्मशानभूमी येथे राबणाऱ्यांचे अश्रू सुहास राजेशिर्के यांनी पुसले.
वृध्दाश्रमात अन्नवाटप, फळेवाटप करण्यापासून कोरोना रुग्णांचा खर्च करण्यापर्यंत कोरोनाकाळात त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली. धोक्याची तमा न बाळगता पोवई नाका तसेच शहर परिसरात ड्यूटी करणाऱ्या पोलिसांना नाश्ता देऊन प्रोत्साहित केले.
पाणीपुरवठा सभापती व उपनगराध्यक्ष म्हणून सुहास राजेशिर्के यांनी नवोपक्रम आणि अथक मेहनतीने उत्तम कारकीर्द गाजविली. राजेशिर्के घराणे छत्रपती शिवरायांचे निकटवर्तीय घराणे मानले जाते. शिवप्रभूंचे समाजसेवेचे व्रत जोपासण्यासाठी आपण जे केले ते मनोभावे केले, असे राजेशिर्के सांगतात. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे ते विश्वासू निकटवर्ती मानल्या जाणाऱ्या राजेशिर्के यांनी कोविडकाळात केलेल्या मदतकार्याबद्दल अनेक मान्यवरांनी प्रशंसा व्यक्त केली आहे.
“संकटग्रस्तांचे जगणे सुसह्य करण्यासाठी शक्य तेवढी मदत केली पाहिजे. कोरोनाची परिस्थिती कधी निवळेल हे अस्पष्ट आहे. अशा वेळी सक्षम लोकांनी गरिबांना आधार द्यायला हवा. मी जी मदत केलीय वा करतोय ते काही फार मोठे काम नाही. माणूस म्हणून माणसाला मदत करणं हा साधा माणुसकीचा सिध्दांत आहे, तो आपण जपला पाहिजे. खारीचा वाटा आपण उचलला पाहिजे.” अशी प्रतिक्रिया या कार्याबद्दल बोलतांना माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी व्यक्त केली.
You must be logged in to post a comment.