कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ

यवतेश्वर येथील मेळाव्यात मताधिक्य देण्याचा शब्द 

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): कास पठार परिसरातील सर्वच गावातील लोकांनी एकत्र येत खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी ठाम उभा राहण्याचा निर्णय घेतला. या गावातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा शब्द स्थानिक नेत्यांनी दिला.

यवतेश्वर येथे परिसरातील गावांचा मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यासाठी महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, लोकसभा संयोजक सुनील काटकर, सोमनाथ जाधव, अमोल जाधव, हृदयनाथ पारटे, राजू भोसले, अमोल जाधव, नंदकुमार जाधव आदींची उपस्थिती होती.

या मेळाव्यात खासदार उदयनराजे म्हणाले, कास परिसराचा पर्यटनाच्या अंगाने विकास करण्यावर भर दिला आहे. भविष्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. महायुतीच्या सरकारने विकास कामांच्या बाबतीत काही कमी केलेले नाही. आता केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येणार आहे. त्यामुळे सर्वांनी महायुतीच्या पाठीशी राहावे. प्रगतीची वाट आपण निवडलेली आहे, आणखीन गतीने होण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करूया.

आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, कास पठाराचा विकास करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न केले. छोट्या छोट्या गावांमध्येही रस्त्यांचे जाळे विणले आहे. स्थानिक जनतेला अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न झाला मात्र भूमिपुत्रांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहिलो.

कासच्या नवीन पाईपलाईन मधून टॅब देऊन परिसरातील गावांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करू. या निवडणुकीत सर्वांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी खंबीरपणे राहायचे आहे.दरम्यान, यावेळी हृदयनाथ पारटे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवलेल्या सिध्दी पवार हिचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!