सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सदर बझार येथील नागरिकांना गेल्या पंधरा दिवसांपासून कमी दाबाने पाणी मिळत आहे. याबाबत जीवन प्राधिकरणकडे वारंवार तक्रारी करूनही उपायोजना न करण्यात आल्याने संतप्त नागरिकांनी रविवारी प्राधिकरणच्या अभियंत्यांनाच घेराव घातला. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिक शांत झाले.
सदर बझार परिसराला जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा केला जातो. सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून, नागरिकांकडून पाण्याची मागणीही वाढली आहे. मात्र, ऐन उन्हाळ्यात सदर बझारमधील नागरिकांना कृत्रीम टंचाईचा सामना करावा लागत आहे. पंधरा दिवसांपासून कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येबाबत नागरिकांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकाºयांची भेट घेऊन पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली होती. मात्र, या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने रविवारी सकाळी संतप्त नागरिकांनी जीवन प्राधिकरणचे अभियंता जंगम यांना घेराव घातला.
नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन दोन दिवसात पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन अभियंता जंगम यांनी दिले. दरम्यान, पाणीपुरठा पूर्ववत न झाल्यास कांदा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला.
You must be logged in to post a comment.