दणदणाट रोखण्यासाठी सुशांत मोरे यांची याचिका

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): साताऱ्यात वाढत्या ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न अखेर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या दारात पोहोचला आहे. येथील पर्यावरणप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्ह्यातील डीजे, डॉल्बी व लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात थेट याचिका दाखल केली आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान होणाऱ्या डेसिबल मर्यादेपलीकडील आवाजामुळे नागरिकांच्या आरोग्यावर व शांततेवर गंभीर परिणाम होत असून, तातडीने नियंत्रण आणावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
मोरे यांनी दाखल केलेल्या याचिकेत जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक पोलीस अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही नियमांची अंमलबजावणी केली नाही, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० चे उल्लंघन होत असून, नागरिकांना प्रदूषणमुक्त वातावरणाचा हक्क घटनेच्या अनुच्छेद २१ अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे, याची आठवण याचिकेत करून देण्यात आली आहे.
स्थानिक माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या घटनांचा हवाला देत मोरे यांनी लाऊडस्पीकरचा आवाज अनेकदा १०० डेसिबलपेक्षा जास्त झाल्याने आरोग्यास धोका निर्माण झाला आणि इमारतींचे नुकसानही झाले, असे अधोरेखित केले आहे. माहिती अधिकाराखाली विचारले तरी अधिकाऱ्यांनी माहिती दडवली आणि कारवाई टाळली, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर साउंड सिस्टीमवर बंदी, उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंड व ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, ध्वनीप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका व सामाजिक शांततेला बाधा पोहोचत आहे. यापूर्वी मी गणेश विसर्जनाच्या बाबतीत आवाज उठवून कृत्रिम तळी उभारण्याचा मार्ग न्यायालयातून काढून दिला. त्याच धर्तीवर आता ध्वनीप्रदूषणाविरोधात न्यायालयीन लढा देत आहे. नागरिकांना न्याय मिळावा, हा यामागचा एकमेव हेतू असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले.
लोकप्रतिनिधींनी डीजे बंदीसाठी आग्रही भूमिका घ्यावी : सुशांत मोरे
ध्वनीप्रदूषणाबाबत लोकप्रतिनिधींनी ठाम भूमिका घ्यावी. आज युवा वर्ग रोजगाराऐवजी डीजे संस्कृतीत अडकला आहे. लोकप्रतिनिधींनी त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, डीजेला प्रोत्साहन देऊ नये. ज्येष्ठ नागरिकांनी डीजेविरोधात पावसात मोर्चा काढला, पण तरुणांनी त्यांच्या आई-वडिलांचा विचार करावा. गणेशोत्सवाचा मूळ हेतू लोकमान्य टिळकांनी जोपासला होता, त्याचा विद्रूप चेहरा आज दिसतो आहे. त्यामुळेच मी याचिका दाखल केली आहे, अशी भूमिका मोरे यांनी स्पष्ट केली.

You must be logged in to post a comment.