जालना,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : तुम्ही चर्चेला तयार राहा,मी तुमच्यावरील गुन्हे मागे घ्यायला लावतो. येत्या दोन-तीन दिवसात तातडीची या संदर्भात बैठक घेतली जाईल हा जो अनुचित प्रकार घडला त्यासंबंधी निश्चितच चौकशी होईल, असे स्पष्ट आश्वासन खासदार उदयनराजे भोसले यांनी जालना येथील अंतरवाली सराटी या गावात उपोषणासाठी बसलेल्या आंदोलकांना दिले. दरम्यान, यावेळी या घटनेत जखमी झालेल्यांची विचारपूस उदयनराजेंनी केली यामुळे आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी या गावात आंदोलकांनी मनोज जिरंगे यांच्या नेतृत्वाखाली शांततामय मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी त्यांच्यावर केलेल्या लाठी हल्ल्यांमध्ये दोन महिलांसह २३ जण जखमी झाले. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत खा.उदयनराजे भोसले यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन थेट जालना येथे धाव घेतली. या गावात जाऊन आंदोलकांशी त्यांनी स्पष्ट संवाद साधला तसेच अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी आंदोलकांची चौकशी केली. लवकर बरे व्हा, अशा दिलासा देत त्यांनी आंदोलकांशी संवाद साधल्याने परिसरातील तणाव निवळला आहे.
मनोज जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा करताना उदयनराजे म्हणाले, तुम्ही चर्चेला तयार राहा मी गुन्हे मागे घ्यायला लावतो. जरांगे पाटील यांनी यावेळी घडलेला सर्व प्रकार उदयनराजे यांना कथन केला. राजे तुम्ही सांगितले तर मी आंदोलन मागे घेईल आणि घरी जाईन. उदयनराजे पुढे म्हणाले, माझा स्वभाव तुम्हाला माहित आहे मी कोणालाही घाबरत नाही पण या गोष्टी चर्चेशिवाय सुटणार नाहीत.
आपण गुरांनाही इतकं मारत नाही. लाठीचार्जचा आदेश देणाऱ्याला निलंबित करायला लावणार अशी आश्वासन त्यांनी दिले उदयनराजे यांनी आंदोलकांची जेव्हा भेट घेतली तेव्हा खासदार शरद पवार हे सुद्धा आंदोलन स्थळी उपस्थित होते.खा.उदयनराजे यांच्या भूमिकेचे शरद पवार यांनी कौतुक केले.
लाठी हल्ल्याचा जो प्रकार घडला तो अत्यंत अनुचित आहे या प्रकरणामागील सत्य लवकरच शोधून काढले जाईल.लाठीचार्ज करणाऱ्यांना तत्काळ निलंबित करायला आपण सूचना करू, मराठा समाजाला तत्काळ आरक्षण मिळायला हवे. खरंतर हे फार पूर्वी व्हायला हवे होते ज्यावेळेस अशा प्रकारचा अन्याय होतो तेव्हाच उद्रेक होण्याची भीती असते. आपण सर्वांनी शांततेत आणि संयमाने ही भूमिका घ्यावी असे आवाहन खासदार उदयनराजे यांनी केले.
मराठा आरक्षणासंदर्भात ५७ महामोर्चा घडले मात्र अनुचित प्रकार घडला नाही मराठा समाज सहन करतो याचा अर्थ त्याकडे दुर्लक्ष करावे असे नाही. गायकवाड कमिशनमध्ये ज्या थोड्याफार चुका होत्या त्या दुरुस्त करून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावं, असे आवाहन खासदार उदयनराजे यांनी केले. लाठी हल्ल्याची येथील डीएसपींनी जी ऑर्डर दिली त्याचा मी निषेध करतो, असेही यावेळी उदयनराजे म्हणाले.
You must be logged in to post a comment.