सत्यजितसिंह पाटणकर यांना स्वराज्य प्रतिष्ठानचा पाठिंबा

रकुलकार्तिकेय पार्वती महादेव (पूर्वाश्रमीचे संदीपदादा मोझर) यांची घोषणा

पाटण,(भूमिशिल्प वृत्तसेवा) :सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात पाटण विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांना आपला बिनशर्त पाठिंबा असल्याचे स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रकुलकार्तिकेय पार्वती महादेव (पूर्वाश्रमीचे संदीपदादा मोझर) यांनी जाहीर केले आहे.

याबाबत प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रकुलकार्तिकेय पार्वती महादेव (पूर्वाश्रमीचे संदीपदादा मोझर) यांनी म्हटले आहे की, गेल्या वीस वर्षांपासून आपण सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आहोत. मध्यंतरीच्या सात वर्षांच्या काळात अध्यात्मसेवेत असल्याने सार्वजनिक जीवनात सक्रिय नव्हतो. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यामध्ये सत्यजितसिंह पाटणकर व त्यांचे पिताश्री माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर (दादा) यांच्याशी गेल्या २५ वर्षांपासून असलेल्या स्नेहसंबंधातून आपण ही भूमिका जाहीर करत आहोत. स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापूर्वी आपण अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये गरजू नागरिक व विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि आरोग्यविषयक अडचणी निवारण्यासाठी आपण वेळोवेळी मोठे सहकार्य केले होते. ज्येष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठीही सातत्याने शिबिरे घेऊन त्यांच्या शस्त्रक्रिया करण्याबरोबरच मोफत चष्मे वाटपाचे उपक्रमही राबवले होते. याशिवाय वेळोवेळी रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरांचेही आयोजन केले होते. मायक्रो फायनान्स कंपनीकडून माता-भगिनींना दिल्या जात असलेल्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर मोठे व्यापक जनआंदोलनही उभारले होते.

उंडाळे येथील ‘रयत कुमुदा’ साखर कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तसेच वाहतूकदारांच्या प्रश्नावरही आपण जोरदार आवाज उठवला होता.याशिवाय शेतकरी व बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून आपण वेळोवेळी मार्गदर्शन केले होते. तसेच बेरोजगारी हटवण्यासाठी अनेक उपक्रम ही राबवले होते. या पार्श्वभूमीवर आपले अनुयायी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर पाटण मतदारसंघात आहेत. पुणे, मुंबई येथे कार्यरत असलेले पाटणमधील चाकरमानीही आपणास व्यक्तिगतरीत्या मानतात. त्यामुळे आपल्या शब्दाला पाटण तालुक्यामध्ये असलेले महत्त्व लक्षात घेता, निश्चितच आमची ताकद पाटण विधानसभा मतदारसंघांमध्ये बहुमोल आहे. त्यातच पाटणकर घराण्याची आपले असलेली मैत्री अधिक दृढ करण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत आपण सत्यजितसिंह पाटणकर यांना बिनशर्त पाठिंबा देत असून आपल्या सर्व अनुयायी व कार्यकर्त्यांना त्यांच्या प्रचारामध्ये सक्रिय होण्याच्या व ऑटो रिक्षा या निवडणूक चिन्हाचा प्रचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आमच्या स्वराज्य प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी सत्यजितदादांच्या प्रत्यक्ष प्रचार कार्यासही सुरुवात केली आहे. सत्यजितसिंहदादांच्या विजयामध्ये आपलेही योगदान असेल, याची आपणास खात्री आहे, असेही रकुलकार्तिकेय पार्वती महादेव (दादा) यांनी म्हटले आहे.

पाटण तालुक्यात २० – २१ वर्षांपासून आपण केलेल्या बहुमोल सामाजिक योगदानामुळे तेथे आपल्या शब्दाला मोठा मान आहे. त्यामुळे आपला पाठींबा निर्णायक आहे. या पार्श्वभूमीवर योग्य उमेदवारच विधानसभेत निवडून जावा, म्हणून आपण हा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी स्वराज्य प्रतिष्ठानचे पाटण तालुक्यातील पदाधिकारी मधुकर जाधव (दिवशी), सोनू भिसे(नवा रस्ता), पै. सतीश बानुगडे आदिंसह प्रमुख कार्यकर्ते मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान स्वराज्य प्रतिष्ठान व दादांच्या पाठिंब्यामुळे सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मताधिक्यात वाढ होणार असल्याने पाटणकर समर्थकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!