कोडोली येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात आवाहन
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये चोऱ्यामाऱ्या करून दहशत पसरवणाऱ्या गुंडाला माझ्या विरोधातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराने बळ दिले, गुंडगिरी पोसत मतांचा जोगवा मागणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत जनतेने धडा शिकवावा असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
कोडोली ता. सातारा येथे कोडोली वनवासवाडी जिल्हा परिषद गट व वर्णे गावातील आजी-माजी कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी कोरेगावचे आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, माजी सभापती सुनील काटकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अर्चना देशमुख, संदीप शिंदे, जिल्हा बँकेच्या संचालक कांचन साळुंखे,पंचायत समितीचे माजी सदस्य प्रवीण धसके, भास्करराव घोरपडे,विलासराव घोरपडे, निलेश कुलकर्णी, प्रवीण साळुंखे, माजी उपसभापती विजय काळे, संतोष कणसे, बाळासाहेब खरात,मधुकर पवार, सयाजी ताटे आदींची उपस्थिती होती.
उदयनराजे म्हणाले,नगरसेवक पदापासून माझ्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली. कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना माझ्या पत्रामुळे झाली. जिल्ह्यात जी ११ धरणे झाली आहेत ती याच महामंडळाच्या माध्यमातून झाली. दुष्काळी भागाला पाणी मिळाले. मी दोनदा खासदार झालो, त्यानंतर माझ्याकडे कुठलेही पद नव्हते मात्र मी गप्प बसून राहिलो नाही. मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह आणि प्रचंड उपस्थिती यातूनच आगामी भविष्याची नांदी पाहायला मिळते आहे.
आमदार महेश शिंदे म्हणाले, उदयनराजेंनी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच दिवशी लोकसभा निवडणुकीतील त्यांचा विजय निश्चित झाला. उदयनराजेंच्या सभांना प्रचंड अशी गर्दी होत आहे. याच गर्दीचे रूपांतर मतांमध्ये करूया. उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने विजयी करायचे आहे, त्यासाठी ज्या बूथला जास्त मते त्या बूथला भविष्यात जास्त कामे असे धोरण राबवले जाणार आहे. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी मतदानाचा अधिकार सुरू झाला आहे. या सैनिकांच्या घरी गाठीभेटी घेऊन भाजपला मतदान करण्याबाबत आवाहन करावे.
संदीप शिंदे म्हणाले,खासदार उदयनराजेंमुळे साताऱ्याचे नाव देशभर आदराने घेतले जाते. त्यांच्या विरोधात न्यायालयाने दोषी ठरवलेला बाजार समितीतील एफएसआय घोटाळ्यातील संशयित निवडणुकीसाठी उभा आहे. वाशी मार्केटमध्ये आपल्या भागातूनच कृषीमाल विक्रीसाठी पाठवला जातो. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशातील २० टक्के वाटा कोणाला जातो, त्याचा जाब आता विचारायची वेळ आलेली आहे. देशाचा स्वाभिमान असलेल्या उदयनराजेंना मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवायचे आहे.
याप्रसंगी राजू पाटील कांचन साळुंखे, विलास घोरपडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
You must be logged in to post a comment.