शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधीची तरतूद : पाटील

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): सामाजिक क्षेत्रांमध्ये तसेच देशाच्या व राज्याच्या प्रशानामध्ये उच्चपदावर काम करणारे जास्तीत जास्त अधिकारी हे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आहेत. पुढील काळातही अशाच पद्धतीने विद्यार्थी घडावेत, त्यांना अधिकचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून जिल्हा नियोजन समितीमधून मोठ्या निधीची तरतुद करण्यात आली आहे, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

येथील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात सन 2020-21 व 2021-22 या वर्षातील आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्काराचे वितरण आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाज कल्याण सभापती कल्पना खाडे, महिला व बाल विकास सभापती सोनाली पोळ, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, अरुण गोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, मुख्य लेखाअधिकारी विकास सावंत, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रभावती कोळेकर आदी उपस्थित होते. 

कोरोना संसर्गामुळे अनेक निर्बंध आहेत. या निर्बंधाच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे चांगले काम शिक्षक करीत आहेत.  जिल्हा परिषदेचा शिक्षणाचा दर्जा चांगला  आहे, हा दर्जा वाढविण्यासाठी स्मार्ट टीव्ही, संगणक देण्यात आले आहेत. त्याचबरोबर स्मार्ट बोर्डसाठी 4 कोटींची तरतुद तसेच नवीन शाळांसाठी तरतुदही करण्यात आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत शिक्षकांनी चांगल्या पद्धतीने काम केले. ज्या शिक्षकांना पुरस्कार मिळाला आहे त्यांची जबाबदारी आता वाढली आहे. लवकर कोरोनाचे संकट दूर होईल आणि पुन्हा शाळा गजबजून जातील, अशी अपेक्षाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. पालकमंत्री श्री. पाटील यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षक व शिक्षीका यांचे अभिनंदन केले. 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले म्हणाले, सातारा जिल्ह्यातील 90 ते 95 टक्के शाळा ह्या डिजीटल झाल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक शाळेत येवून मुलांना ऑनलाईन शिकवत आहेत. ज्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा नाही अशा ठिकाणी भेट देवून मुलांना शिक्षण देत आहेत. खासगी शाळांमुळे स्पर्धा वाढली आहे या स्पर्धेत मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी झोकून देवून काम करावे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.समाज घडविण्यामध्ये शिक्षकांचा मोठा वाटा आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षक देण्यात येत असून जिल्हा परिषदेच्या शाळांना नवलौकीक मिळावा यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.प्रास्ताविकात शिक्षण व अर्थ समितीचे सभापती यांनी शैक्षणिक आढावा सांगितला.या कार्यक्रमास पुरस्कार प्राप्त शिक्षक, शिक्षिका व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

error: Content is protected !!