तहसीलदार, प्रांत कार्यालयासाठी सुसज्ज इमारत उभारावी : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : प्रांताधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय सातारा ही दोन्ही कार्यालये पोवई नाक्याजवळ एकाच परिसरात पूर्वापारपासून कार्यरत आहेत. त्याच आवारात महसूल विभागाशी संलग्न अन्य शासकीय कार्यालये, सेतू कार्यालय असून याठिकाणी जागेच्या कमतरतेमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असते. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी तहसीलदार, प्रांताधिकारी कार्यालयासह इतर सर्वच कार्यालयांसाठी सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारावी, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली  

सातारा येथील उप विभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय सातारा हे पोवई नाका जवळील १.१० हे.आर. इतक्या कमी जागेत आहे. याच ठिकाणी अधिक्षक भूमी अभिलेख सातारा, उपअधिक्षक भूमि अभिलेख सातारा, दुय्यम निबंधक सातारा, नगर भूमापन अधिकारी सातारा, मुद्रांक जिल्हाधिकारी सातारा, सेतु कार्यालय ही सर्व कार्यालये आहेत. त्यातच याच ठिकाणी ३१ स्टॅप व्हेंडर/ पिटीशन रायटर व कॅन्टीन आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या कामानिमित्त या परिसरारच्या आवारात दररोज येणाऱ्या नागरिकांची संख्या खुप मोठी असून उपलब्ध जागा अत्यंत कमी पडत आहे. त्यामुळे अंतर्गत वाहनांची पार्किंग व्यवस्था पुरेशी करता येत नाही आणि छोटी कार्यालये पाहता याठिकाणी नागरिकांसह शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत असते. 

नागरिकांची गैरसोय टाळून त्याठिकाणच्या सर्वच कार्यालयांतील कामकाजामध्ये सुसूत्रता आणि सुलभता येऊन त्याचा फायदा नागरिकांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्हावा यासाठी प्रांताधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय सातारा यासह सदर जागेतील सर्व कार्यालयांसाठी एक सुसज्ज प्रशासकीय इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री ना. पवार यांच्याकडे केली.

error: Content is protected !!