सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा):राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या सातारा जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, संघटना आपापल्या पक्षाच्या ध्येयधोरणानुसार कार्यरत आहेत. निवडणूक काळात राजकीय तत्वानुसार सर्वजण भूमिका बजावत असतात. मात्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष व माण- खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर अपघातामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून आणि प्रत्यक्ष भेटून विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी राजकीय सहिष्णुता व संस्कृतीचे दर्शन घडवले आहे.
विधिमंडळातील कामकाज संपून पुण्यात पोहोचल्यावर तिथून गावी दहिवडी जात असताना आमदार गोरे यांच्या गाडीस फलटण येथे भीषण अपघात झाला. त्यामध्ये त्यांच्यासह अन्य सहप्रवासी व चालक गंभीर जखमी झाले. सर्व जखमींवर तातडीने उपचार करण्यात आले.आमदार गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचार सुरू आहेत.मुळातच नियमित व्यायाम व आहार विहाराबाबत योग्य ती दक्षता घेत असल्याने आमदार गोरे यांची प्रकृती औषधोपचारास उत्तम प्रतिसाद देत आहे.लवकरच त्यांच्या प्रकृतीस आराम मिळेल अशी माहिती रुग्णालय सूत्रांकडून दिली जात आहे. मात्र राजकीय जीवनात परस्परांचे उणे धुणे काढणारी त्यांची विरोधक मंडळी आणि पक्षांतर्गत विरोधकही आमदार गोरे यांच्यावर उद्भवलेल्या अपघातग्रस्त परिस्थितीत त्यांची विचारपूस करण्यासाठी आवर्जून रुग्णालयात गेले.भाजपाचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर हे तर आमदार गोरे यांचे परममित्र अपघात घडला तेव्हा सर्वप्रथम तेच घटनास्थळी धावून गेले व त्यांनी तातडीने उपचाराची व्यवस्था केली. मात्र पुण्यात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व त्यांच्याच पक्षाचे विविध आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राहुल कुल व अन्य लोकप्रतिनिधी व नेते मंडळी आवर्जून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले.
याशिवाय ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींवर सातत्याने श्री. गोरे टीका करीत असतात त्या पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आवर्जून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात भेटून आले याशिवाय माण खटाव मतदार संघातील आमदार गोरे यांचे विरोधक प्रभाकर देशमुख हे सुद्धा रुग्णालयातून त्यांना भेटून गेले तर खासदार उदयनराजे, मंत्री शंभूराज देसाई,आ.शिवेद्रसिंहराजे,भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व खटावचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्यासह विविध पक्षातील मंडळीही रुबी हॉल क्लिनिक मध्ये आमदार गोरे यांच्या प्रकृतीची चौकशी करून गेले.
दरम्यान आमदार गोरे यांच्यावर प्रेम करणारे केवळ माण खटाव फलटणमधीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते मंडळी तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांतील लहान मोठी नेतेमंडळी यांचा सातत्याने पुण्यात रुग्णालयाकडे राबता आहे.आमदार गोरे यांच्या पत्नी सौ. सोनिया गोरे व कुटुंबीयांनी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून लवकरच जया भाऊ मतदारसंघात येथील त्यांच्या प्रकृतीस आराम पडत आहे, अशी माहिती दिली. याशिवाय अपघातग्रस्त परिस्थितीमुळे उद्भवलेल्या प्रकृती अस्वास्थ्यातून लवकरात लवकर आमदार गोरे यांना आराम मिळावा म्हणून त्यांच्या समर्थकांनी विविध देवदेवतांना साकडे घातले आहे. मात्र विरोधी पक्षातील जबाबदार नेतेमंडळींनी ही रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना दिलेला दिलासा म्हणजे सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातील सहिष्णुता व संस्कृतीचे दर्शन आहे अशी चर्चा सर्वत्र होत आहे.
शेखर गोरेंची आमदार बंधूंकडे पाठ
राजकीय भाऊबंदकीतून परस्परांमधून विस्तवही जात नाही, असे आमदार गोरे यांचे कनिष्ठ बंधू व शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शेखरभाऊ गोरे यांनी मात्र अद्यापही रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली नाही, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.
You must be logged in to post a comment.