पाटण,(अजित जगताप) : पाटण तालुक्यातील नानेगाव खुर्द येथील सुमारे २५ वर्षापासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न आज सोडविण्यात यश आले आहे. नानेगाव पासून पुढे चार-पाच वाड्यांना जोडणारा हा प्रमुख रस्ता होता.
शेतकरी व ग्रामस्थ तसेच विद्यार्थी, शेतमजूर, कष्टकरी यांना येण्यासाठी हा एकमेव रस्ता होता.नानेगाव खुर्द येथे जाण्या-येण्यासाठी एक नाला देखील पार करावा लागतो .त्यावर छोटासा पुल बांधण्यात आला होता.पावसाळ्यात या ठिकाणी असलेल्या नाल्यांना पावसाळ्यात पुर आल्यानंतर वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत होती.त्यामुळे छोटासा पूल बांधण्यात आल्यानंतर देखील त्याचा वापर करता येत नव्हता.
नानेगाव खुर्द गावठाण लगत जाणारा हा रस्ता एका स्थानिक शेतकऱ्याने अडवल्यामुळे संपूर्ण गावाची तसेच त्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. याबाबत वेळोवेळी पाटण तहसीलदार व प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी तथा पालकमंत्री सातारा यांचेकडे देखील याबाबत त्यांनी निवेदन सादर केलेले होते. आणि यासंदर्भात तहसीलदार पाटण यांचे न्यायालयात सन २०१८ मध्ये केस चालवून त्यामध्ये रस्ता खुला करून देण्याचा निर्णय देखील झालेला होता.त्यानंतर कोणत्याही महसुली किंवा दिवाणी न्यायालयाचे अंतरिम आदेश नसताना देखील सदरचा रस्ता खुला करून देण्यास संबंधित शेतकरी टाळाटाळ करत होते.
अखेर आज महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी व प्रांताधिकारी यांनी पुढाकार घेऊन तसेच तहसीलदार,पोलीस उपाधीक्षक,सहाय्यक पोलीस निरीक्षक व सर्व कर्मचारी यांचे उपस्थितीमध्ये व बंदोबस्तामध्ये सदरचा रस्ता हा खुला करून देण्यात आला.त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांचा हा काहीसा अवघड बनलेला प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता तो सोडविण्यात प्रशासनाला यश आलेले आहे.
याबाबत शेतकरी,शेतमजूर, विद्यार्थी व परिसरातील सर्वच ग्रामस्थांनी प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी तथा पालकमंत्री यांना धन्यवाद दिले आहेत.या कार्यवाहीमुळे समाधान व आनंद व्यक्त करीत आहेत.
You must be logged in to post a comment.