रयत शिक्षण संस्थेची घटना बदलणाऱ्यांना धडा शिकवणार

खासदार उदयनराजे भोसले यांचा इशारा, मल्हारपेठ येथील मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती

मल्हारपेठ,(भूमिशिल्प वृत्तसेवा): रयत शिक्षण संस्थेच्या घटनेमध्ये राज्याचा मुख्यमंत्री हा संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष असला पाहिजे असा उल्लेख आहे. मात्र ही घटना बदलून ती आपल्या ताब्यात ठेवणाऱ्यांना धडा शिकवणार आहे, असा इशारा महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.

मल्हार पेठ ता. पाटण येथील आयोजीत प्रचार मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार, विजय नाना पवार,भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.भरत पाटील, मच्छिंद्र सकटे,शंकर पाटील,अमित भिसे,शिवाजी पानसकर,चंद्रकांत भिसे, सावित्री बडेकर, विजय शिंदे, सुधाकर देसाई,शरद भिसे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

उदयनराजे म्हणाले, गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. आमची आजी आणि आजोबा यांनी यासाठी कर्मवीरांना सर्वतोपरी मदत केली होती. मात्र ही संस्था आपली खाजगी मालमत्ता असल्यासारखे निर्णय काही लोकांनी घेतले. गोरगरिबांची संस्था आता पैसे दिल्याशिवाय गोरगरिबांनाही प्रवेश देत नाही. स्थापने वेळची घटना पुन्हा अंमलात आणून या संस्थेवर मुख्यमंत्र्यांना अध्यक्षपद मिळावे अशी मागणी केली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांना देखील निवेदन देणार आहे त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून घटना बदलणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवावा.

विकासकामे करणाऱ्यांच्या पाठीशी राहा, असे आवाहन करत उदयनराजे म्हणाले, महाविकास आघाडीच्या उमेदवाराने त्यांच्याकडे सिंचन खाते असताना एक पैसाही सिंचनावर खर्च केला नाही. आता गावोगावी जाऊन ते मते मागत आहेत. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शौचालय आणि टीडीआर घोटाळ्यामध्ये ते अंतरिम जामिनावर आहेत. अशा व्यक्तीला यशवंत विचार सांगणाऱ्या ज्येष्ठ नेत्याने माझे विरोधात उमेदवारी दिलेली आहे. यशवंत विचारांना तिलांजली देण्याचे काम त्यांनी केले आहे.

विस्थापितांना प्रस्थापित करण्यासाठी माझा लढा

काँग्रेस नेत्यांच्या चुकीमुळे सातारा, जावळी, पाटण, कराड या भागातील जनतेला पोटापाण्यासाठी विस्थापित व्हावे लागले. आता आपल्या सातारा जिल्ह्यात मोठे प्रकल्प उभारून विस्थापित झालेल्या स्थानिक लोकांना प्रस्थापित करण्यासाठी मी लढा हाती घेणार आहे. यासाठी जनतेने मला साथ द्यावी असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्रीपदासाठी वारसदाराने विचार सोडले

भारतीय जनता पक्षाशी शिवसेनेची नैसर्गिक युती ३५ वर्षे होती. भाजपबरोबर निवडणूक लढवून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत संसार थाटण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार या वारसदाराने सोडले. मात्र एकनाथ शिंदे यांनी हे विचार जपण्यासाठी बंड करत आम्हाला सोबत घेऊन भाजप, शिवसेनेचे सरकारची स्थापना केली, असे स्पष्टीकरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी केले.

error: Content is protected !!