जनतेच्या समस्या सोडवणे हे नगरसेवकाचे कर्तव्य : आ.शिवेंद्रसिंहराजे

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा):नगरसेवक हा नागरिकांचा सेवक असतो. प्रभाग, वॉर्ड मधील समस्या सोडवून नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा पुरविणे आणि नागरिकांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवणे हे प्रत्येक नगरसेवकाचे कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य पार पाडण्यात नगर विकास आघाडीचे नगरसेवक नेहमीच कटिबद्ध राहिले आहेत, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. 

कोरोना, अतिवृष्टी असो किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो आ. शिवेंद्रसिंहराजे आपत्तीग्रस्त, गरजू लोकांच्या मदतीसाठी नेहमीच अग्रेसर असतात. कोरोना काळात कोरोना केअर सेंटर उभारणीपासून, मोफत अन्नधान्य वाटप, रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देणे आदींसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे नेहमीच तत्पर होते. आता सातारा- जावली मतदारसंघातील जनतेला पावसाळ्यात दिलासा मिळावा म्हणून आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामार्फत ५० हजार छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. शहरातील प्रभाग क्र. १५ मध्ये आज या उपक्रमाचा शुभारंभ आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक अमोल मोहिते, सौ. आशा पंडित, भालचंद्र निकम, पिंटू जगदाळे, किशोर पंडित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 


शहरातील विविध भागामध्ये गोर- गरीब आणि गरजू लोकांना छत्र्यांचे वाटप करण्यात येत आहे. सातारा आणि जावली तालुक्यातही छत्री वाटप सुरु झाले असून आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मार्फत ५० हजार छत्र्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे अमोल मोहिते यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, नगर विकास आघाडीने सातारकरांच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय दिला असून आघाडीचा प्रत्येक नगरसेवक नागरिकांचा सेवक म्हणूनच काम करत असतो, याचा मला अभिमान आहे. यापुढेही सातारकरांच्या समस्या सोडवण्यासाठी आघाडीतील प्रत्येक नगरसेवक अविरत कार्यरत राहील, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यानिमित्ताने दिला. 

error: Content is protected !!