साताऱ्यात तीन दिवसांपासून हुडहुडी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा : जिल्ह्यातील किमान तापमान खाली आल्याने तीन दिवसांपासून गारठा वाढला आहे. सातारा शहरातील पाराही १२ अंशावर स्थिर आहे. त्यातच जिल्ह्यात थंड हवेची लहर असल्याने सकाळच्या सुमारास नागरिकांना हुडहुडी भरुन येत आहे.

जिल्ह्यात दरवर्षी हिवाळी ऋतुत किमान तापमान १० अंशापर्यंत खाली येते. सातारा शहरातीलही थंडीतही वाढ होते. पण, यंदा सातारा शहरातील तापमान १२ अंशाच्या खाली आलेच नाही. त्यामुळे थंडीची म्हणावी, अशी तीव्रता जाणवली नाही. त्यातच गेल्यावर्षी दिवाळीनंतर तर हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे किमान तापमान सतत १५ अंशावरच राहिले होते. तर मागील महिन्यात एकवेळच सातारा शहरात १२ अंश तापमानाची नोंद झाली. त्यानंतर तापमान १८ अंशापर्यंत वाढत गेले. काही दिवस थंडी नसल्यासारखी स्थिती होती. मात्र, मंगळवारपासून जिल्ह्यात थंडगार वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे थंडी चांगलीच जाणवत आहे.

बुधवारी सातारा शहरात १२ अंश किमान तापमानाची नोंद झाली होती. या हंगामात दुसऱ्यांदा १२ अंशापर्यंत तापमान खाली आल्याचे दिसून आले. तर गुरुवारी १२.०३ अंशा तापमान नोंद झाले. सातारच्या तापमानात किंचीत वाढ झाली असलीतरी वातावरणात गारठा जाणवत होता. 

error: Content is protected !!