मराठी अभिजात भाषेचा मुद्दा संमेलनाच्या भाषणात मांडणार : संमेलनाध्यक्ष रविंद्र शोभणे

सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : मराठी अभिजात भाषेचा मुद्दा संमेलनाच्या मुख्य भाषणात मांडणार असल्याचे मत ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ,प्रसिद्ध लेखक डॉ. रविंद्र शोभणे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा,शाहूपुरी व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था सातारा यांच्यावतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल साताऱ्यात रविंद्र शोभणे यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक समीर शेख,ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ, पुणे जिल्हा मसाप प्रतिनिधी शिरीष चिटणीस, मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत, उपाध्यक्ष अजित साळुंखे,,किशोर बेडकिहाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना रविंद्र शोभणे म्हणाले की, साताऱ्याच्या भूमीतच माझी साहित्यिक वाटचाल सुरू झाली. सातारकाराचे प्रेम माझ्यावर भरपूर आहे आगामी काळात साहित्य संमेलन साताऱ्यात होईल तसेच आपला ऋणानुबंध कायम राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.तीस वर्षांपूर्वी साताऱ्यात साहित्य संमेलन झाले त्यावेळी मी एकदा साताऱ्यात येऊन गेलो होतो. कर्मवीर भाऊराव पाटलांची कर्मभूमी आहे हे मी ऐकून होतो. साहित्य संमेलनाच्या चर्चेमध्ये माझे नाव येत होते यावेळी मला शिरीष चिटणीसांचा फोन आला त्यावेळी त्यांनी मला सांगितले मी आणि विनोद कुलकर्णी यांनी एकमताने ठरवले असून आमचा तुम्हाला पाठिंबा आहे.त्यांच्या या पाठिंब्या बद्दल त्यांचा मी आभारी आहे. चाळीस वर्षापासून मी आज लिहीत आहे. माझ्या लेखनाच्या कारकीर्दीत अनेक जणांनी मला सहकार्य केले त्यांचा मी ऋणी आहे. मी आधुनिक साहित्यावर लेखन केले नसून प्राचीन महाभारत रामायण यांचा देखील अभ्यास केला आहे. एखादा लेखक जेव्हा घडतो उभा राहतो तेव्हा त्या लेखकांची दृष्टी चौफेर असावी लागते आपले सामाजिक प्रश्न आपली परंपरा या सर्वांना समजून घेण्याची गरज आहे. एक लेखक म्हणून सामाजिक प्रश्नांची जाण असलेला समाजाचा घटक म्हणून जेव्हां मी उभा राहतो त्यावेळी अनेक प्रश्नाचा गुंता माझ्यासमोर नेहमीच येतो. सध्या अध्यक्ष भाषणाचा विचार करत आहे.अध्यक्ष भाषण कसे असावे याचा मी अभ्यास करत आहे. आजच्या परिस्थितीच्या दृष्टीने आपल्याला विचार करायला पाहिजे की आपल्या मराठी शाळा धडा धड बंद होत आहेत आणि हेच कटु सत्य आहे. आणि त्याचे धोके आपल्याला पुढे भोगावे लागणार आहेत. भारतातल्या सहा भाषा आभिजात दर्जाच्या आहेत. तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी तिथल्या राज्यकर्त्यांनी प्रयत्न केले.आणि ती भाषा अभिजात भाषा म्हणून मिळवली. आपल्यातील एखादा ही राज्यकर्ता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करताना दिसून येत नाही याची खंत वाटते. मराठी साहित्य संमेलनात जे काही सरकारला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी विचारणारच आहे माझ्या अध्यक्ष भाषण ज्यावेळी होईल त्यावेळी तुमच्या अपेक्षांची पूर्तता होणार याची ग्वाही देतो.

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख म्हणाले की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद घेऊन रविंद्र शोभणे यांनी मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांचे स्वागत व सत्कार करण्यासाठी आपण येथेच उपस्थित आहोत जबाबदारीचे पद त्यांना मिळालेले आहेत त्यांच्या समोर अनेक प्रश्न असणार आहेत आपण सर्वांनी त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून ते प्रश्न पाठवावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. प्रश्न आपल्यासमोर उपस्थित आहेत मराठी साहित्याचे वाचन खोलपर्यंत केले पाहिजे ते अजून पोहोचलेले नाही इतर भाषेचे वर्चस्व तेही एक कारण असू शकते त्याला आपण प्रोत्साहन दिले पाहिजे गावोगावी वाचनालय असावे असे अनेकांचे स्वप्न असले तरी ते स्वप्नच राहिले आहे. आपल्या येथे भिलार हे पुस्तकाचे गाव आहे घरोघरी वाचनालय आहेत. आपल्याकडे बरेच साधने आहेत आपल्याकडे स्वप्न बघणारे कष्ट करणारे लोक आहेत.मात्र त्यांना मार्ग दाखवणे ही तितकेच गरजेचे आहे असे मत त्यांनी यावेळी मांडले.

यावेळी विनोद कुलकर्णी म्हणाले की, नागपूर मध्ये रविंद्र शोभणे यांना मी पाहिले होते व वर्ध्याच्या साहित्य संमेलनात दोन-चार भेटी झाल्या होत्या. चिटणीस यांनी मला सांगितले रविंद्र शोभणे हे साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत त्यावेळी मला ही निवडणूक सोपी वाटली. निवडणुकीत अटीतटीचा सामना या वेळी पहावयास मिळाला. रविंद्र शोभणे यांना अध्यक्षपद मिळू नये दबाव गट वाटला होता यावेळी मी, मिलिंद जोशी यांना दबावाला बळी न पडता शोभणे यांना निवडून द्यायचे आहे अशी विनंती केली. मिलिंद जोशी यांनीही पुढाकार घेऊन अत्यंत काठावर रविंद्र शोभणे यांना साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आणले. मराठी भाषेसाठी आम्ही दिल्लीत जाऊन आंदोलन केले. आम्ही प्रयत्न केला पण तो प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही. साहित्य परिषदेचे अध्यक्ष झाले असल्याने रविंद्र शोभणे यांनी मराठी भाषा अभिजीत दर्जा मिळावा हा प्रश्न हातात घ्यावा तसेच साहित्य संमेलचा अध्यक्ष भाषणात आपण हा मुद्दा प्रखरतेने मांडावा तसेच याबाबत राज्यकर्त्यांना जाब विचारावा असे कडक भाषण आपल्या मार्फत साहित्य संमेलनात होणे गरजेचे आहे. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

किशोर बेडकिहाळ यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. तसेच सावित्री जगदाळे यांच्या उजळपरी या पुस्तकाचे रविंद्र शोभणे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

प्रास्ताविक शिरीष चिटणीस व सूत्रसंचालन नंदकुमार सावंत यांनी केले.कार्यक्रमास जनता बँकेचे अनिल जठार, डॉ. उमेश करंबेळकर, डॉ. संदीप श्रोत्री, डॉ. वर्षा देशपांडे, प्रदीप कांबळे,श्रीधर साळुंखे, शाम बडवे व इतर मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!