धरणग्रस्तांची जमीन गेली चक्क चोरीला

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मौल्यवान वस्तूंची चोरी आपण नेहमीच पाहतो, वाचतो आणि ऐकतोसुद्धा. शासकीय योजनेतून अनुदान मिळालेली विहीरसुद्धा चोरीस गेल्याच्या सुरस कथा मध्यंतरी उघडकीस आल्या होत्या. मात्र ज्यांच्या त्यागातून राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली अशा धरणग्रस्त शेतकऱ्याची पुनर्वसनापोटी मिळालेली जमीनच चक्क चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या परवडीमुळे त्रस्त झालेल्या अहिर (ता. महाबळेश्वर) येथील मागासवर्गीय शेतकऱ्याने प्रशासनाच्या उदासीनतेविरुद्ध प्रसंगी आत्मदहन करण्याचा निर्धार प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.

याबाबतची सविस्तर हकीकत अशी की, सिंचन व ऊर्जानिर्मितीसाठी उभारलेले कोयना धरण व कोयना नदी ‘महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी’ म्हणून ओळखले जातात. या धरणाच्या निर्मितीवेळी जावली, महाबळेश्वर, पाटण आदी तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी बुडाल्या. पूर्वीच्या जावळी तालुक्यातील व नंतर महाबळेश्वर तालुक्यात समाविष्ट झालेल्या अहिर या छोटेखानी गावातील पांडू विठू महार (सकपाळ) या मागासवर्गीय शेतकऱ्याची गट नंबर 52/3,     52/12, 52/15, 52/33 या गटांमधील 1.85 हेक्टर जमीनही धरणक्षेत्रात गेली. राष्ट्रीय कर्तव्य व शासकीय निर्णयाचा आदर राखत सामाजिक बांधिलकीतून संबंधित कुटुंबाने आपली वाडवडिलार्जित जमीन धरणाच्या कामासाठी दिली. त्यापोटी त्यांना सोलापूर जिल्ह्यात विरवडे बुद्रुक येथे पर्यायी जमीनही देण्यात आली. याबाबत गावच्या आव्हाड व संकलन रजिस्टरलाही पांडू विठू महार व त्यांचा मुलगा विठ्ठल पांडू सकपाळ यांच्या नावाची नोंद झाली. मात्र यथावकाश त्यांचा मुलगा व नातवंडे यांनी याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी सातारा, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मोहोळ तहसील कचेरी येथे संपर्क केला. त्यावेळी तेथे कोठेही त्यांच्या नावावरील जमिनीची कागदपत्रे वा नोंदी आढळून आल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी सातारा येथील पुनर्वसन कार्यालयाशी संपर्क साधला असता, “तुम्हाला यापूर्वीच जमीन दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला आता जमीन मिळणार नाही” असे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तोंडी सांगितले.
जर आम्हास जमीन दिली आहे तर ती कुठे आहे हे सांगा अशी विचारणा केली असता संबंधित कार्यालयातील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मागासवर्गीय सकपाळ कुटुंबीयांची बोळवण केली व उडवाउडवीची उत्तरे देत अपमानास्पद वागणूक दिली त्यामुळे पोटी संबंधित सकपाळ कुटुंबाने आपली जमीन चोरीस गेल्याची व्यथा पत्रकारांसमोर मांडली आहे. त्यातूनच आपल्या जमिनीची चोरी झाल्याची कैफियत पांडू महार (सकपाळ) यांचे पुत्र विठ्ठल सकपाळ यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे.

आमची जमीन धरणात बुडाली, सोलापूर जिल्ह्यात पर्यायी दिल्याचे सांगितले जाते, मात्र त्याचा कोणताही धागादोरा आम्हाला प्रशासन आम्हाला देत नाही. आमची पुनर्वसनपोटी सोलापूर जिल्ह्यात मिळालेली जमीनच गायब झाल्याने साताऱ्याचे जिल्हाधिकारी आणि पुनर्वसन अधिकाऱ्यांनी आम्हास ती शोधून द्यावी, असे असे पांडू महार (सकपाळ) यांचे नातू विजय विठ्ठल सकपाळ यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले असून चोरीस गेलेली जमीन परत न मिळाल्याने “हेची फळ काय मम तपाला” असे व्यथित होऊन संबंधित मागासवर्गीय कुटुंबाने आपली व्यथा मांडली आहे.

याबाबत न्याय न मिळाल्यास आणि आमची चोरीस गेलेली जमीन शोधून न दिल्यास प्रसंगी उपोषण आत्मदहन करण्याचा निर्धारही विजय संकपाळ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.
संबंधित कुटुंबाची व्यथा आणि अवहेलना लक्षात घेऊन प्रशासनाने त्यांची चोरीस गेलेली जमीन शोधून द्यावी व धरणाच्या निर्मितीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची कदर करावी,अशी अपेक्षा जाणकार नागरिकांतून व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!