सातारा लोकसभा मतदार संघात ४० सभा घेण्याचा सल्ला
मारुल हवेली,(भूमिशिल्प वृत्तसेवा): यशवंत विचार सांगणाऱ्यांना आता काही काम उरलेले नाही. या मानसपुत्राने माझ्या विरोधात जिल्ह्यात चार सभा घेतल्या आहेत. त्यांचे नेतृत्व अवघ्या साडेतीन जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले आहे, अशी टीका महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केली तसेच आता त्यांच्याकडे काही काम उरलेले नाही, त्यांनी चार नाही तर ४० सभा घ्याव्यात, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
मारूल हवेली ता. पाटण येथे विभागातील घटक पक्षातील कार्यकर्ता संवाद मिळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भरत पाटील,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, ॲड.मिलिंद पाटील,बाबुराव नांगरे,रमेश पाटील, पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते डी.पी.जाधव,अशोकराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उदयनराजे म्हणाले, मानसपुत्रांच्या पक्षाला कोकण, विदर्भ, खानदेशात प्रतिनिधित्व उरलेले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यापुरतं त्यांना काम राहिलेले आहे. त्यामुळे माझ्यावर असलेल्या अतिप्रेमामुळे त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघात चार सभा नियोजित केल्या आहेत. त्यांनी चार नव्हे ४० सभा घेतल्या तरी काही फरक पडणार नाही ,कारण सातारा जिल्ह्यातील जनता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
पापाचा वाटेकरी व्हायचं नव्हतं म्हणून राजीनामा दिला
२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात मी राजीनामा दिला. त्यासाठी अनेक कारणे होती, राजीनामा देण्यापूर्वी ज्या जनतेने मला निवडून दिले, त्या जनतेशी मी संवाद साधायला हवा होता, त्याबाबतीत माझी चूक झाली मान्य करतो. पण घोटाळे बहाद्दरांच्या बरोबर मी काम करू शकत नाही. माझा कोंडमारा झाला म्हणून मी राजीनामा दिला आणि पोटनिवडणूक लागली, असे स्पष्टीकरण उदयनराजेंनी या सभेत दिले.
या भागातील जनता विकास कामाकडे बघून मते देते. लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजे उमेदवार असले तरी मीच उमेदवार आहे हे लक्षात घेऊन जनतेने उदयनराजेंच्या पाठीशी राहावे.
– पालकमंत्री शंभूराजे देसाई
You must be logged in to post a comment.