कोरेगाव पोलिस निरीक्षकांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :कोरेगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) च्या वतीने सातारा शहराध्यक्ष सुनील काळेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे संबंधित पोलिस निरीक्षकांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोरेगाव तालुक्यात काही अवैध धंद्यांना मोकळे रान मिळाल्याचे चित्र असून, अशा बेकायदेशीर व्यवहारांमुळे गुन्हेगारीला पोषक वातावरण निर्माण होत आहे. अवैध धंद्यांतून मिळणाऱ्या पैशामुळे गुन्हेगारी बळावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कोरेगाव तालुक्यातील अनेक गुन्ह्यांमध्ये कारवाई सुरू असताना, आसरे गावातील विद्यमान व माजी सरपंचांवर हल्ला करून त्यांच्यावर जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

या प्रकरणी वारंवार तक्रारी करूनही पोलिस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने, संपूर्ण तालुक्यात आश्चर्य व्यक्त होत असून पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, आंदोलनाचा इशारा दिल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. कोरेगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यावर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

हे निवेदन देताना शहर उपाध्यक्ष सचिन बागल यांच्यासह सौ. सुवर्णाताई पाटील, सौ. समिन्द्राताई जाधव, सौ. नलिनी जाधव, सौ. उषा जाधव, सौ. तेजस्विनी केसरकर, सौ. शैलजा कदम, सौ. सीमा पवार, सौ. निर्मला पाटील, शफीकभाई शेख, प्रताप जगदाळे, विकास राठोड, सुमित कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!