सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : एका खूनाच्या गुन्ह्यासह इतर १६ गुन्ह्यात फरार असलेल्या पोलीस रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार यश उर्फ नाना पाटेकर भाउबीज उर्फ भावज्या काळे (मूळ रा.फत्त्यापूर सध्या रा. आसगाव दोन्ही ता.सातारा) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली.दरम्यान, एक खून, विनयभंग व इतर चोरीचे असे एकूण १७ गुन्हे नाना पाटेकरवर दाखल आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, नाना पाटेकर याच्याविरुध्द कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, सातारा तालुका हद्दीत विनयभंग, भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक १३ गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यात तो सातारा पोलिसांना हवा होता. स्थानिक पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत होता. कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी झाल्यानंतर पोलीस त्या घरफोडीचा शोध घेत असताना त्यामध्ये संशयित नाना पाटेकर असल्याचे समोर आले. एलसीबीचे पोलीस तपास करत असताना त्यांना त्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयिताकडे चौकशी केली असता त्याने कोरेगावमधील घरफोडीची कबुली दिली.पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याच्यावर १६ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. तसेच खुनासारख्या गुन्ह्यात देखील तो पसार असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी त्याला कोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, पोलीस हवालदार कांतीलाल नवघणे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, अतिश घाडगे, शरद बेबले, मंगेश महाडीक, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, रोहित निकम, सचिन ससाणे यांनी या कारवाईत भाग घेतला.
You must be logged in to post a comment.