डोंगरदऱ्यातील जनतेनेच आपली निवडणूक हाती घेतली आहे : सत्यजितसिंह पाटणकर

विरोधकांच्या बेगडीपणाला पाटणची जनता वैतागल्याने विजयाची खात्री

पाटण,(भूमिशिल्प वृत्तसेवा): महाविकास आघाडीमध्ये आपणास उमेदवारी मिळाली नसली तरी, ऑटो रिक्षा चिन्हाच्या रूपाने अपक्ष उमेदवार म्हणून जनतेनेच आपली निवडणूक हाती घेतली आहे. गेल्या दहा वर्षात तालुक्यात काहीच विकास झाला नाही. जी काही विकास कामे झालीत, ती विक्रमसिंह पाटणकर यांच्या कार्यकाळातच झाली आहेत, विकासाची ही परंपरा पुढे चालवण्यासाठी डोंगरदऱ्यातील मतदार आपणासच विजयी करतील, अशी खात्री पाटण विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘भूमिशिल्प’शी बोलताना श्री. पाटणकर म्हणाले की, आपणास पक्षाने तिकीट दिले नसले तरी, स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी जनरेट्याच्या बळावर आपण ही निवडणूक लढवत आहोत. मतदारसंघांमध्ये चांगला विकास घडवायला पाहिजे, म्हणूनच जनता जनार्दनाच्या आग्रहाखातर आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. आमच्या पिताश्रींनीही अपक्ष म्हणूनच राजकीय कारकीर्द सुरू केली होती. त्याच धर्तीवर अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाताना आपणास अजिबात अवघडले जात नाही. चाळीस वर्षांपूर्वी जर अपक्ष म्हणून पाटणकर घराण्यास जनतेने पाठिंबा दिला तर आजच्या आधुनिक कालखंडात सोशल मीडिया आणि जनजागृतीच्या काळात रिक्षा हे आमचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत आणि २३ नोव्हेंबर रोजी च्या निकालातून हे सिद्ध होईल, अशी खात्रीही सत्यजितसिंह पाटणकर यांनी यावेळी व्यक्त केली.

आमचे विरोधक उत्पादन शुल्क मंत्री असल्याने गेले काही वर्ष तालुक्यात केवळ बिअर बारची संख्या वाढवण्याव्यतिरिक्त त्यांनी काही विकास केला नाही. मतदार संघातील रस्त्याचे जाळे हे विक्रमसिंह पाटणकर यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात केलेली कामगिरी आहे, असे सांगून सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले की, तालुक्यातील वाडीवस्त्यावर वीज पोहचवण्याचं काम बाळ सरकार यांनीच केले आहे. दुर्गम गावात शिक्षण उपलब्ध होण्यासाठी त्यांनी विधिमंडळात आवाज उठवला होता. स्वातंत्र्योत्तर काळातील तालुक्यातील पहिले पर्यटन केंद्र नेहरू उद्यानाच्या रूपाने कोयनानगरमध्ये सुरू केले. तालुक्यात सर्वप्रथम आयटीआय शिक्षणाची व्यवस्था आम्हीच केली. कोयना शिक्षण संस्थेच्या माध्यमातून २२ माध्यमिक शाळा आणि कॉलेजेससुद्धा आम्हीच उभारून ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्याचे काम केले.

पाटण विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येक खोऱ्यात एक अशी सात धरणे उभारण्याची दूरदृष्टीही पाटणकरांनीच दाखवली. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही आम्हीच प्रयत्नांची शिकस्त केली. पाटणमध्ये झालेली पहिली एमआयडीसीही आम्हीच आणली.याउलट विकास कामांचा देखावा करून जनतेला फसवण्याचा उद्योग विरोधकांनी केला आहे. बाजारभावापेक्षा यांच्या कारखान्यातून साडेतीनशे रुपये कमी देऊन शेतकऱ्यांच्या परिश्रमाची टिंगल करण्याचा उद्योग विरोधक करत आहेत. इतकेच काय पण स्वतःच्या पक्षाशी गद्दारी करणारे जनतेशी एकनिष्ठ काय राहणार?, असा प्रश्नही सत्यजितसिंह पाटणकर यांनी यावेळी उपस्थित केला.

पाटणमधील जनतेचे मुंबईतील स्थलांतर थांबवावे यासाठी आम्ही तालुक्यात शुगर फॅक्टरी, दूध संस्था यांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करत आहोत. शिक्षणाच्या माध्यमातूनही युवा पिढीला सक्षम करत आहोत, चुकीच्या मार्गाने जात असलेल्या तरुणाईला योग्य मार्गदर्शन व हाताला काम मिळावे यासाठी आमचा प्रयत्न असेल, तालुक्यात नव्याने रस्त्याचे जाळे निर्माण व्हावे हा सुद्धा आपला प्रयत्न असेल, याशिवाय खोटेपणाचा सुरू असलेली बजबजपुरी दूर करण्यासाठी जनता आपल्याच पाठीशी ठाम राहील, व निवडणुकीत आपला विजय होईल कारण जनता विरोधकांच्या बेगडीपणाला कंटाळली आहे, देखावा न करणारा त्यांचा आदर करणारा लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी जनतेनेच आपली निवडणूक हाती घेतली आहे, असेही श्री. पाटणकर म्हणाले.

error: Content is protected !!