लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी

भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भगवान कांबळे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी, सातारा यांच्याकडे केली.

निवेदनात म्हटले आहे की,सध्याची परिस्थिती पाहता उन्हाचा तडाखा वाढला असून, उष्माघाताने अनेक नागरिकांना खूपच त्रास होत आहे, अनेक जणांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे.सातारा लोकसभेचे मतदान सात मे रोजी आहे. आणि मतदानाच्या तारखेपर्यंत उन्हाचा तडाखा अजून वाढण्याची शक्यता असून दुपारच्या वेळी मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडतील याबाबत साशंकता आहे.आणि यामुळे मतदान कमी होण्याची शक्यता आहे.या सर्व बाबींचा विचार करून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानासाठी यावे यासाठी मतदानाची वेळ ही संध्याकाळी सात वाजेपर्यंत वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच उष्माघातापासून वाचण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर, प्रथमोपचार पेटी, छत्र्या , पिण्याच्या पाण्याच्या थंड बाटल्या किंवा मोठे जार आणि ग्लास तसेच ओआरएस ची पाकिटे यांची व्यवस्था करावी, प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचारासाठी तज्ञ किंवा शिकावू डॉक्टरांची व्यवस्था करावी, मतदारांना उन्हात उभे राहावे लागू नये यासाठी तात्पुरत्या तंबू ची, मंडपाची व्यवस्था करावी आणि मतदान केंद्राच्या गेटपासून मतदान केंद्राच्या खोलीपर्यंत कारपेट टाकण्याची व्यवस्था करावी अशी मागणी सुद्धा भारतीय जनता पार्टी तर्फे निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम बोराटे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, सातारा शहर सरचिटणीस विक्रांत भोसले, प्रवीण शहाणे उपस्थित होते

error: Content is protected !!