कोरेगाव, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी वयाच्या केवळ 23 व्या वर्षी देशासाठी केलेले बलिदान अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांचे अतुलनीय धैर्य आणि शौर्य तरुण पिढीला दीपस्तंभाप्रमाणे आहे., असे प्रतिपादन विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.
कोरेगाव पंचायत समितीमध्ये शहीद दिनानिमित्त या महान क्रांतिकारक देशभक्तांना आदरांजली वाहण्यात आली. त्यावेळी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी श्रीमती क्रांती बोराटे, कक्ष अधिकारी श्रीमती वैशाली अनुसे,अधीक्षक श्री.राजेंद्र शिंदे, कृषी अधिकारी श्रीमती दीप्ती बावधनकर तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .
क्षीरसागर पुढे बोलतांना म्हणाले,” अत्यंत तरुण वयात या क्रांतिकारकांनी देशासाठी महान त्याग केला. चंद्रशेखर आझाद यांना त्यांनी गुरु मानले आणि वाटचाल सुरू केली. असहकार आंदोलनात भाग घेतला .त्यानंतर लाला लजपतराय यांच्या वरील हल्ल्याचा बदला म्हणून सॉंडर्स या जुलमी इंग्रज अधिकार्याला अत्यंत धीराने आणि नियोजनबद्ध रीतीने ठार केले .यावेळी राजगुरू ,भगतसिंग उपस्थित होते. 1929 मध्ये बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांनी केंद्रीय कायदे मंडळात जुलमी कायद्याचा निषेध म्हणुन बॉम्ब फेकला आणि स्वतःला अटक करून घेतली. आपले विचार आणि तत्वज्ञान संपूर्ण देशासमोर पोहोचावे म्हणून त्यांनी स्वतःवरच खटला चालवून घेतला.तुरुंगात प्रचंड कष्ट सहन केले .छळ सहन केला .भगतसिंग यांना वाचनाची खूप आवड होती. त्यांनी 716 दिवसांच्या कारावासाच्या कालावधीत 300 पेक्षा जास्त पुस्तके वाचून त्याची टिपणे काढली. भगतसिंग हे केवळ क्रांतीकारक आणि महान देशभक्त नव्हते तर ते प्रभावी वक्ते, कवी, पत्रकार आणि लेखक होते. अशी माहिती सांगून श्री क्षीरसागर पुढे म्हणाले,” तुरुंगात भारतीय क्रांतिकारकांना राज कैद्यांचा दर्जा मिळावा म्हणून उपोषण केले. प्रचंड हालअपेष्टा सहन केल्या आणि सवलती मिळवून दिल्या. फाशीच्या एक दिवस अगोदर भगतसिंग यांनी आपल्या मित्रांना पत्र लिहून आपल्या सुटकेसाठी प्रयत्न करु नये असे आवाहन केले. यातून त्यांचे धैर्य संयम आणि मनाचा कणखरपणा दिसून येतो .राजगुरू सुखदेव आणि भगतसिंग या महान देशभक्तांची मैत्री आजच्या तरुणांपुढील आदर्श आहे. देशासाठी विशिष्ट ध्येय समोर ठेवून काहीतरी मोठे कार्य करावे आणि माणुसकीची सेवा करावी, असे महान विचार भगतसिंग यांचे होते. तेच विचार आज तरुण पिढीने अमलात आणणे गरजेचे आहे, असे देखील श्री.क्षीरसागर म्हणाले.
You must be logged in to post a comment.