हरीष पाटणे यांच्या माध्यमातून अधिस्वीकृती मिळाल्याचे समाधान

अधिस्वीकृती पत्रिका वितरण कार्यक्रमात पत्रकारांनी व्यक्त केल्या भावना

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्या रूपाने पत्रकारांना उमद्या स्वभावाचा व रोखठोक नेतृत्वाचा अध्यक्ष लाभला आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत अधिस्वीकृती मिळाल्याचे समाधान वाटते, अशा प्रतिक्रिया जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नव्याने अधिस्वीकृती मिळालेल्या पत्रकारांनी व्यक्त केल्या आहेत.

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना निकषानुसार अधिस्वीकृती पत्रिका देण्यात येते. पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीने मंजूर केलेल्या सातारा जिल्ह्यातील विविध पत्रकारांच्या अर्जांना राज्य समितीने मंजुरी दिली आहे. त्यानुसार प्राप्त अधिस्वीकृती पत्रिकांचे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्या हस्ते नुकतेच वितरण करण्यात आले.सातारा येथील जिल्हा माहिती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास पुणे विभागाच्या प्रभारी माहिती उपसंचालक वर्षा पाटोळे, समितीचे सदस्य गोरख तावरे, चंद्रसेन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

जुलै २०२४ मध्ये झालेल्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीने पाच पत्रकारांचे अधिस्वीकृतीचे अर्ज व सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत दोन अधिस्वीकृती अर्ज असे एकुण सात अर्ज विभागीय अधिस्वीकृती समितीने मंजूर केले होते. विभागीय समितीने मंजूर करून पाठवलेल्या या अर्जांना राज्य समितीमध्ये मंजुरी मिळाली होती.

मंजूर झालेल्या अधिस्वीकृती पत्रिका समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्या हस्ते व सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित पत्रकारांना वितरीत करण्यात आल्या. त्यावेळी नव्याने अधिस्वीकृती प्राप्त झालेल्या पत्रकारांनी समाधान व्यक्त केले व श्री. पाटणे यांच्या नेतृत्वाखाली शहरी आणि ग्रामीण भागातील पत्रकारांनाही न्याय मिळत आहे. आपल्या सहकाऱ्यांना नवनवीन संधी मिळण्यासाठी ते करीत असलेले प्रयत्न स्तुत्य आहेत, असेही पत्रकारांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

पत्रकारांनी अधिस्वीकृतीसाठी अर्ज करावेत : पाटणे

दरम्यान,सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी कागदपत्रांची पुर्तता करुन अधिस्वीकृती पत्रिका मिळण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, सातारा येथे अर्ज करावेत, असे आवाहनही समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अधिस्वीकृती समितीचा अध्यक्ष झालो, तेव्हाच म्हणालो होतो की, “सिर्फ हंगामा खडा करना हमारा मकसद नहीं है, कोशिश ये रहेगी की सुरत बदलनी चाहिए ..!” आज ग्रामीण भागातील पत्रकार सहकारी मित्रांना मी आणि माझी समिती अधिस्वीकृती पत्रिका देत आहे याचे मोठे समाधान आम्हाला आहे.

  • हरीष पाटणे, अध्यक्ष, पुणे विभागीय अधिस्वीकृती समिती.
error: Content is protected !!