वाईकरांसाठी तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
वाई,(भूमिशिल्प वृत्तसेवा): वाई फेस्टिव्हलने या वर्षी अनेक अनोख्या उपक्रमांसह रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यशस्वी उपक्रमांमुळे हा फेस्टिव्हल आता केवळ वाईपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला आहे. २० ते २२ डिसेंबर या तीन दिवसांत फेस्टिव्हलच्या आकर्षक कार्यक्रमांची मेजवानीच वाईकरांसाठी असणार आहे.
शरीराची श्रीमंती दाखवणारी जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा शुक्रवार दि २० डिसेंबर २०२४ रोजी सायं. ६ वा महागणपती घाट वाई येथे संपन्न होणार आहे. यामध्ये महिला बॉडी बिल्डर मा दीपा सप्रे व मा शीतल वाडेकर यांची या स्पर्धेला उपस्थिती हे यावर्षीचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. वाईकरांच्या सर्वाधिक पसंतीस उतरणारा कार्यक्रम म्हणजेच ग्रुप डान्स स्पर्धा. नृत्यातील वैविध्यपूर्ण शैली दाखवणारी राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा शनिवार दि २१ डिसेंबर २०२४ रोजी सायं. ६ वा महागणपती घाट वाई येथे संपन्न होणार आहे. तसेच वाईकरांचे मनोरंजन करण्यासाठी यावर्षी रविवार दि २२ डिसेंबर २०२४ रोजी सायं. ६ वा महागणपती घाट वाई येथे सोनी मराठी वाहिनीवरील हास्यजत्रा या कार्यक्रमातील कलाकार यांच्यासोबत दिलखुलास गप्पा व विनोदाची मैफिल याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महिलांसाठी खास क्रांती नाना मालेगावकर यांचा न्यु होम मिनिस्टर “खेळ पैठणीचा” या कार्यक्रमाचे आयोजन देखील त्याच दिवशी करण्यात आले आहे.
वाई फेस्टिवल २०२४ अंतर्गत संपन्न झालेल्या चित्रकला स्पर्धा , रक्तदान शिबीर , विविध गुणदर्शन स्पर्धा व सायकल रॅली यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता फेस्टिवल समितीने समाधान व्यक्त केले. वाईकर सर्व नागरिक यांचे पुरेपूर मनोरंजन करण्यासाठी वाई फेस्टिवल समितीने आयोजित केलेल्या आगामी कार्यक्रमांना देखील भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन संस्थेचे निमंत्रक श्री अमर आनंद कोल्हापुरे यांनी पत्रकार परिषदेत केले.
वाई फेस्टिवलचा मुख्य हेतू म्हणजे वाईमधील विविध कलाकारांना, त्यांच्या कलांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे, तरुण पिढीला प्रोत्साहन देणे, तसेच सामाजिक आणि पर्यावरणीय संवेदनशीलता वाढवणे हा असून वाई फेस्टिवल हा केवळ मनोरंजनाचा उत्सव नाही तर विविध कला, कलाकार, आणि संस्कृती यांना एकत्र आणणारा एक सेतू आहे. हा उत्सव वाईच्या कलाप्रेमींनी निर्माण केलेल्या प्रोत्साहनाचा परिणाम असून वाईकरांच्या योगदानामुळे आणि सहभागामुळे वाई फेस्टिवल एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे.
या सोहळ्याचे हे १७ वे वर्ष असून हा सोहळा अविरत सुरु राहण्यापाठीमागे आयोजक म्हणून उत्कर्ष पतसंस्था व वाई जिमखाना वाई , तसेच अनेक दानशूर प्रायोजक व मार्गदर्शक, सहकारी यांचा मोलाचा वाटा आहे व या सर्वांचे आभार वाई फेस्टिवल समितीचे अध्यक्ष श्री शरद चव्हाण , कोषाध्यक्ष ॲड रमेश यादव व सचिव श्री सुनील शिंदे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी फेस्टिवल चे समिती सदस्य श्रीमती अनुराधा कोल्हापुरे, श्री मदन साळवेकर , श्री श्रीकांत शिंदे , श्री सलीमभाई बागवान , श्री संजय वाईकर , श्री सागर मुळे , श्री वैभव फुले , श्री भूषण तारू , श्री शैलेंद्र गोखले , श्री अमीर बागुल , सौ प्रीती कोल्हापुरे , श्री नितीन वाघचौडे , श्री तुकाराम जेधे , श्रीमती नीला कुलकर्णी , श्रीमती अलका घाडगे, श्री प्रशांत मांढरे , श्री प्रणव गुजर , श्री निखिल चव्हाण , श्री नितीन शिंदे , श्री ओंकार सपकाळ हे उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.