सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मानले आभार
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मिळवलेला विजय हा महायुतीतील सर्वच घटकांनी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टाचे फलित आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा लोकसभा संयोजक व सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर यांनी केले आहे.
लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर श्री. काटकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या आभाराच्या पत्रकात वरील मत व्यक्त केले आहे. या प्रसिद्धी पत्रकार श्री काटकर यांनी पुढे म्हटले आहे की,यंदाच्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना सर्व पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची भूमिका बजावत असणारे सातारा लोकसभा मतदार संघातील सर्व शहरातील नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष, नगरसेवक तसेच ग्रामीण भागातील सर्व आजी- माजी सभापती, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सर्वच सरपंच व ग्रामपंचायत- नगरपंचायत सदस्य यांचेसह मतदारांना बूथपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडणारे महायुती व खासदार उदयनराजेंवर प्रेम करणारे सर्व मावळे यांचा उस्फुर्त कामगिरीच्या जोरावर हा ऐतिहासिक विजयोत्सव साजरा करण्याची संधी सातारकरांना उपलब्ध झाली.
तसेच वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करत असताना सैनिक, शिक्षक, वकील, डॉक्टर, कामगार, उद्योग, दलित संघटना यासारख्या विविध संघटनांनी दिलेले योगदान हे या विजयाप्रति महत्त्वाचे ठरले. याशिवाय पोस्टल मतदानाद्वारे सैनिकांच्या जिल्ह्यातील सैनिकांनी आपली जबाबदारी चोख बजावत उदयनराजेंना भरघोस असे मतदान केले. त्या सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करून या निवडणुकीत हस्ते -परहस्ते व ज्ञात -अज्ञात नागरिकांकडून झालेले सहकार्य हेदेखील तितकेच महत्त्वपूर्ण असून खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वतीने संबंधित सर्वांचे आभार व्यक्त करतो, असेही श्री. काटकर यांनी म्हटले आहे.
You must be logged in to post a comment.