आत्तापासूनच घुमू लागले इलेक्शनचे वारे’..!

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : समाज गाडा सुरळीत चालण्यासाठी समाजकारणामध्ये विविध निवडणुका आवश्यक असतातच. मात्र नेते कार्यकर्ते आणि पडद्यामागील सूत्रधारांसाठी निवडणुका खूपच महत्त्वाच्या ठरतात. कोरोना महामारीच्या आपत्ती काळात अनेक निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. मात्र गेल्या वर्षभरापासून विविध सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ लागल्या आहेत.

ओबीसी आरक्षण, न्यायालयाचा निर्णय, नैसर्गिक आपत्ती, पर्जन्य काळ आदींमुळे सातत्याने पुढे ढकलल्या गेलेल्या निवडणुका आता लागोपाठ होऊ लागल्या आहेत अशा परिस्थितीत गेल्या दोन वर्षांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले अनेक ‘भावी नगरसेवक’ आणि झेडपी – पंचायत समितीचे संभाव्य उमेदवार केव्हा एकदा निवडणूक लागते याच्या प्रतीक्षेत आहेत. प्रभाग पद्धत, वॉर्डनिहाय मतदान केंद्रे, आरक्षणाचा तिढा आदी विविध तांत्रिक बाबींमध्ये अडकलेल्या निवडणुका आणि सातत्याने त्यात होत असलेल्या बदलांमुळे राजकीय चित्र सातत्याने वेगवेगळ्या दिशेने भरकटत आहे आहे. सातत्याने बदलत असलेल्या निवडणुकी विषयक धोरणांमुळे नेमके काय नियोजन करावे अशा साशंकतेमध्ये नेते व कार्यकर्ते आहेत.

लोकनियुक्त थेट नगराध्यक्ष व सरपंच तसेच नगरसेवक व सदस्यांमधून पदाधिकाऱ्यांच्या निवडी अशा बदलत्या समीकरणामुळे इच्छुक व त्यांच्या नेतेमंडळी व समर्थकांची चलबिचल होत आहे. मतदार हा लोकशाहीचा खऱ्या अर्थाने राजा असतो आणि त्यांनी निवडून दिलेल्या लोकनियुक्त लोकप्रतिनिधींची मुदत संपल्याने सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये अधिकाऱ्यांकडे करवी प्रशासकीय कारभार चालवला जात आहे. मात्र अधिकाऱ्यांमार्फत सुरू असलेल्या ‘प्रशासनराज’मुळे ठोस निर्णय घेतले जात नाहीत, असा नागरिकांचा अनुभव आणि तक्रारही आहे. याशिवाय सात- आठ वर्षे झाले तरीही, निवडणुका झाल्या नसल्याने केव्हा एकदा निवडणुका होतील? याचीच चर्चा व प्रतीक्षा नेते, कार्यकर्ते व आम जनतेलाही आहे.

वातावरण ढवळून निघणार

जिल्ह्यातील साताऱ्यासह कराड, वाई, फलटण, रहिमतपूर, म्हसवड, पाचगणी, महाबळेश्वर या नगरपालिका व मेढा नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या गट व गणांसाठी होणाऱ्या निवडणुकांमुळे संपूर्ण जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघणार आहे.

error: Content is protected !!