सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सहकारी साखर कारखाने हे शेतकर्यांची आर्थिक उन्नती साधण्याच्या संस्था आहेत. शेतकर्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षक करण्यासाठी सहकारी साखर कारखान्यांचे मोठे योगदान आहे. अजिंक्यतारा साखर कारखाना सामाजिक बांधीलकी स्विकारून अत्यंत कठीण परिस्थितीत, साखर दराची घसरण, बँक व्याजाचा भुर्दंड, उत्पादन खर्चामध्ये होत असलेली सततची वाढ आदी अडचणींना सामोरे जाऊन ऊसउत्पादकांना एफ.आर.पी. नुसार पेमेंट वेळेत अदा करीत आहे. ही बाब खरोखरच कौतुकास्पद असून या कारखान्यास आ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांचे रूपाने खंबीर नेतृत्व लाभल्यामुळेच हा कारखाना अनंत अडचणींवर मात करून आर्थिकदृष्टया सक्षम होत चाललेला आहे. ही बाब अभिमानास्पद असून अजिंंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे कामकाज आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले.
राज्याच्या सहकारी क्षेत्रातील एक नामवंत व आदर्शवत कारखाना म्हणून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याकडे पाहिले जाते. या कारखान्याचे कामकाज आदर्शवत असल्यामुळे राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आज सकाळी कारखान्यास सदिच्छा भेट दिली. यांच्यासमवेत पुणे येथील ऍडिशनल कलेक्टर नलवड होते. यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक शिवेंद्रसिंहराजे भोंसले, चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्वास शेडगे, कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी त्यांचे स्वागत केले.
राज्यात एक आदर्श कारखाना म्हणून नावारुपास आलेल्या अजिंक्यतारा कारखान्याचा या गळीत हंगामातील साखर उतारा जिल्ह्यात उच्चतम आहे. कारखान्याला प्रगतीपथावर नेण्यास आ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्यारुपाने योग्य नेतृत्व लाभल्यामुळेच कारखाना प्रगतीपथावर असल्याचे गायकवाड म्हणाले. तसेच हा कारखाना एफ.आर.पी. प्रमाणे शेतकर्यांचे ऊस पेमेंट वेळेत आदा करीत असून दर दहा दिवसाचे ऊस पेमेंट आदा करणारा महाराष्ट्रातील अजिंक्यतारा कारखाना हा एकमेव कारखाना असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले आणि याबद्दल त्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले, चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
कारखान्याचे कामकाज आणखी प्रगतीपथावर कसे नेता येईल याबाबत गायकवाड यांनी बहुमोल मार्गदर्शन करून तशा सूचना खाते प्रमुख, अधिकार्यांना दिल्या. तसेच कारखान्याचा दि. ३१.३.२०२१ अखेर झालेला नफा व कर्ज उभारणीसाठी असलेली कर्ज उभारणी मर्यादा याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. गायकवाड यांनी कारखान्यामध्ये फिरून कारखाना मशिनरीची पहाणी करून समाधान व्यक्त केले. कामकाजाचा आढावा घेताना आयुक्त गायकवाड यांनी खातेप्रमुखांस विचारलेल्या प्रश्नांची खातेप्रमुखांनी समर्पक उत्तरे दिली.
ऊसउत्पादक शेतकर्यांचे हित विचारात घेऊनच कारखान्याचे कामकाज चालविले जाते. त्यामुळे कारखाना प्रगतीपथावर नेण्यास ऊसउत्पादक सभासद, बिगर सभासद यांचेही बहुमोल सहकार्य लाभत असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे याप्रसंगी म्हणाले. तसेच संचालक मंडळाचे काटकसरीचे धोरण असल्यामुळेच कारखाना प्रगतीपथावर नेण्यास वाव मिळत आहे. त्याचप्रमाणे सभेमध्ये आढावा घेताना साखर गायकवाड यांनी चालू गळीत हंगामामध्ये झालेल्या ऊस गळीताचा आढाव घेतला असता कार्यकारी संचालक देसाई यांनी माहिती दिली कीं, या हंगामात कारखान्याने १४१ व्या दिवशी ५,७३,३१० मे.टनाचे गाळप करून सरासरी १२.८१% साखर उतार्याने ६,७०,५०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. यामध्ये रॉ शुगर ३,०२,००० समाविष्ट असून हंगामाअखेरपर्यंत अंदाजे एकूण ७,२०,००० मे.टन ऊस गाळप होणार असल्याचे सांगितले.
You must be logged in to post a comment.