सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ‘नेतृत्वाची द्यायची दानत असेल तर पाणी मिळतच याचं हे उत्तम उदाहरण आहे. हे श्रेय माझ्या एकट्याचं नसून आपण सर्वांनी मला साथ दिल्यामुळेच आपल्याला हे पाणी मिळाले आहे. टेंभूचं पाणी हे आपल्या सर्वांसाठी जीवनदायिनी ठरणारं आहे,’ असे उद्गार जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी काढले.
कोरेवाडी (ता. माण) येथे आलेल्या टेंभू योजनेच्या पाण्याचे पूजन अनिल देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर, बापूराव नलवडे, विरळीचे सरपंच प्रशांत गोरड, भारत अनुसे, तानाजी बनगर, बापूराव बनगर, काळचौंडीचे उपसरपंच आबा कोरे, बाबाराजे हुलगे, अनिकेत आटपाडकर, गणेश माने, हर्षद माने, किसन माने, किसन घुटूकडे, राजू गोरड, विष्णू जमाले, भागवत पिसे, शहाजी ढेरे, साहेबराव खरात आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
देसाई म्हणाले, ‘टेंभू योजना आपल्याला कायमस्वरुपी चालू ठेवायची आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ आवश्यक आहे. मी जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत कधीच ही योजना बंद पडू देणार नाही. आपला पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी आपल्या शेतीसाठी जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसायचं नाही.’भारत अनुसे म्हणाले, ‘आमचं वर्षानुवर्षांचं स्वप्न सत्यात उतरविण्याचं काम या योजनेमुळे झाले आहे. अनिल देसाई यांनी मोठ्या कौशल्याने आणलेलं पाणी हे, या भागात कधीच पाणी येणार नाही, असं म्हणणाऱ्यांना मोठी चपराक आहे. या पाण्याने हा सर्व परिसराचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.’
बापूराव बनगर म्हणाले, ‘अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली २००३ सालापासून टेंभू योजनेसाठी आम्ही जो संघर्ष केला त्याचे हे यश आहे. या पाण्यामुळे आमचा पाण्यासाठीची वणवण थांबली असून, हा भाग टँकरमुक्त झाला आहे.’
You must be logged in to post a comment.