सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न प्रचंड प्रलंबित आहेत. महाविकास आघाडी शासनाच्या काळात खोटी भुमीपुजन आणि आश्वासने देऊन लोकांना भुलविण्यात आले. सातारच्या मेडिकल कॉलेजला एक रुपया सुद्धा मिळालेला नाही, असा खळबळजनक आरोप कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रणित शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या नेमणूक प्रमाणपत्र समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमातनंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा संपर्क संपर्क प्रमुख शरद कणसे, एकनाथ ओंबळे, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, शहर प्रमुख नीलेश मोरे, जिल्हा संघटक चंद्रकांत जाधव, आदी यावेळी उपस्थित होते.
महेश शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांमध्ये सातारा जिल्ह्याला भरघोस निधी दिला आहे. एकट्या कोरेगाव तालुक्यात रस्ते कामांसाठी तब्बल ५० कोटी रुपयांचा निधी त्यांनी मंजूर केला आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी शासनाने सातारा जिल्ह्यासाठी काही केले नाही. त्यांचा खोटा कळवळा आणि त्यांची खोटी भूमिपूजन यातच बराचसा वेळ गेला. सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी त्यांनी एकही रुपया दिलेला नाही, यापुढे पायाभूत सुविधाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
५० खोके, एकदम ओके या वादग्रस्त घोषणा विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी दिल्या. या विषयी बोलताना शिंदे म्हणाले, गेल्या अडीच वर्षात या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारला फक्त खोक्याची भाषा कळत होती. त्यांचे कॉन्ट्रॅक्टर बडे भांडवलदार यांच्याशी संबंध होते. त्यामुळे ज्याला जसं दिसतं सूचत, तशा घोषणा दिल्या जातात. मी विधानसभेच्या बाहेर पडताना मला बघूनच या घोषणा दिल्या गेल्या, पण मला ५० कोटी रुपये विकास कामांसाठी मिळाले. यातचं मी समाधान मानतो. असं ते म्हणाले.
You must be logged in to post a comment.