महामार्गावर टॅंकरच्या धडकेत तीन ठार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे-बेंगलोर महामार्गावर शिंदेवाडी, ता. खंडाळा परिसरात मंगळवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भरधाव टॅंकरच्या चालकाचा ताबा सुटल्याने टॅंकरने चार-पाच वाहनांना धडक दिली. या धडकेत तीन जण ठार झाले असून पाच जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पुण्याहून साताऱ्याकडे भरधाव जाणाऱ्या दूध टॅकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टॅकर विरूद्ध लेनला जाऊन चार ते पाच वाहनांना भीषण धडक दिली. यामध्ये तिघेजण जागीच ठार झाले तर पाचजण गंभीर जखमी झाले. हा अपघात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिंदेवाडी येथे झाला. हा अपघात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास झाला. दरम्यान, या अपघातातील ठार झालेल्या व्यक्तींची आणि जखमींची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती.

या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. टॅंकरने अनेक वाहनांना धडक दिल्याने जखमींच्या मदतीसाठी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

error: Content is protected !!